AP
आंतरराष्ट्रीय

सर्वसामान्य माणूस अंतराळात करणार ‘स्पेसवॉक’, ‘SpaceX’च्या यानाचे यशस्वी प्रक्षेपण

अंतराळात धोकादायक ठरणारे ‘स्पेसवॉक’ ही आतापर्यंत प्रशिक्षित अंतराळवीरांची मक्तेदारी होती. आता अंतराळात पर्यटनाला जाऊ इच्छिणाऱ्या अंतराळ पर्यटकांना ही संधी मिळाली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अंतराळात धोकादायक ठरणारे ‘स्पेसवॉक’ ही आतापर्यंत प्रशिक्षित अंतराळवीरांची मक्तेदारी होती. आता अंतराळात पर्यटनाला जाऊ इच्छिणाऱ्या अंतराळ पर्यटकांना ही संधी मिळाली आहे. सर्वसामान्य माणसाला ‘स्पेसवॉक’ करण्याची संधी एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने दिली आहे. कंपनीच्या ‘पोलारिस डॉन मिशन’ अंतर्गत चौघेजण अंतराळात गेले आहेत. ते पाच दिवस तेथे राहणार असून सर्वकाही सुरळीत पार पडल्यास अंतराळात बुधवारी रात्री किंवा गुरुवारी ते ‘स्पेसवॉक’ करताना दिसतील.

फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून पहाटे ५.२३ वाजता (स्थानिक वेळेनुसार) ‘फाल्कन ९’ रॉकेटच्या सहाय्याने हे चौघेजण अंतराळात पोहचले. ‘वॅन एलन रेडिएशन बेल्ट‌्स‌’ अंतर्गत प्रवास करणारी ही पहिलीच मानवी मोहीम आहे.

सकाळी उलटी गणती संपल्यानंतर ‘फाल्कन ९ रॉकेट’ने उड्डाण केले. या रॉकेटमधून चार अंतराळ प्रवासी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेले. दीड मिनिटानंतर रॉकेटचा पहिला भाग पृथ्वीवर यशस्वीपणे उतरला. या मोहिमेत उद्योगपती जेयर्ड इसाकमॅन सहभागी झाले आहेत.

हे अंतराळ प्रवासी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रापासून १४०० किमीवरून प्रवास करत आहेत. या उंचीवर ते दहा तास राहणार आहे. या अंतराळवीरांनी स्पेसवॉक करण्यासाठी सूट घातले आहेत. कारण ‘ड्रॅगन कॅप्सूल’ला दोन तासांच्या स्पेसवॉकसाठी दाबरहित केले जाणार आहे. उद्योगपती इसाकमॅन व स्पेसएक्सच्या सारा गिल्स हे या स्पेसवॉकमध्ये सहभागी होतील, तर पायलट स्कॉट किड पोटीट व स्पेसएक्सच्या ऐना मेनन या स्पेसवॉकवर नजर ठेवतील.

हे मिशन ऑगस्टमध्ये होणार होते. पण, खराब हवामानामुळे त्यास विलंब झाला. तसेच या मोहिमेसाठी चारही अंतराळवीर पाच दिवसांनंतर परत पृथ्वीवर सुरक्षितपणे येतील, याची निश्चितीही करायची होती. कारण अंतराळात चालण्यामुळे त्यांना अधिक ऑक्सिजनची गरज होती. या मोहिमेवर गेलेल्या प्रवाशांकडे केवळ पाच ते सहा दिवसांचाच ऑक्सिजन व अन्य जीवनावश्यक उपकरणे आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले