अमेरिकेने धुडकावला इराणचा शांतता प्रस्ताव 
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेने धुडकावला इराणचा शांतता प्रस्ताव

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी इराणने दिलेला शांतता प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'पूर्णपणे अस्वीकारार्ह' असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी इराणने दिलेला शांतता प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'पूर्णपणे अस्वीकारार्ह' असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी या प्रस्तावाचा तपशील उघड केला नसला तरी, रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आता इराणविरुद्ध 'लष्करी पर्यायाचा' विचार करण्याचा सल्ला ट्रम्प यांना दिला आहे.

२८ फेब्रुवारी रोजी इराणसोबत सुरू झालेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्याचा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाला आहे, परिणामी अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे युद्ध संपवण्यासाठी रविवारी इराणकडून एक प्रस्ताव प्राप्त झाला होता. यामुळे तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली होती, मात्र ट्रम्प यांच्या भूमिकेने पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लष्करी कारवाईचे संकेत

दुसरीकडे, रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ट्रम्प यांना लष्करी कारवाईचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. ग्रॅहम यांनी एक्सवर पोस्ट केले की, इराणचे वागणे बदलण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या राजनैतिक प्रयत्नांचे मी स्वागत करतो. परंतु, आंतरराष्ट्रीय जहाजांवर होणारे हल्ले आणि आताचा हा अस्वीकारार्ह प्रस्ताव पाहता, आता मार्ग बदलण्याची वेळ आली आहे. त्यांनी 'प्रोजेक्ट फ्रीडम प्लस' पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

इस्रायलसोबत चर्चा

ट्रम्प यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशीही फोनवरून चर्चा केली. इराणच्या प्रतिसादावर यावेळी चर्चा झाली. ट्रम्प म्हणाले की, आमचे संबंध चांगले आहेत, पण इराणसोबतच्या वाटाघाटी ही माझी परिस्थिती आहे, इतरांची नाही. अमेरिका इराणच्या युरेनियम समृद्धीकरण कार्यक्रमावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करत आहे, तर त्याबदल्यात निर्बंध उठवणे आणि गोठवलेला निधी परत देण्यावर चर्चा सुरू आहे. 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' हा जगातील १/५ कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा मार्ग आहे. या युद्धाच्या नाकेबंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली आहे.

ट्रम्प उद्यापासून चीन दौऱ्यावर

ट्रम्प हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून १३ ते १५ मे दरम्यान चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी ही घोषणा केली. गेल्या नऊ वर्षांतील अमेरिकेच्या अध्यक्षांची ही पहिलीच चीन भेट असेल. यापूर्वी २०१७ मध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट देणारे ट्रम्प हेच शेवटचे अमेरिकेचे अध्यक्ष होते.

हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा पश्चिम आशियामध्ये अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात दीर्घकाळ युद्ध सुरू आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. तसेच, तैवानसह अनेक मुद्द्यांवरून अमेरिका आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या उप-प्रेस सचिव अ‍ॅना केली यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बुधवारी संध्याकाळी बीजिंगमध्ये दाखल होतील. या भेटीचे स्वरूप 'प्रतीकात्मक' असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर गुरुवारी शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक, स्वागत समारंभ, 'टेंपल ऑफ हेवन'ला भेट आणि राजकीय मेजवानीत सहभागी होतील, असे त्या म्हणाल्या.

चीन दौऱ्यापूर्वीच मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना सोमवारी पुन्हा एकदा खीळ बसली असून दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शस्त्रसंधी आता अत्यंत नाजूक स्थितीत असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला आहे. खाडी देशांमधील जहाजांना लक्ष्य केले जात असून इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षाने पुन्हा पेट घेतला आहे. या वाढत्या अस्थिरतेमुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा उघड युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.

इराणने 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वर पकड मिळवली असून अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी केली आहे. यामुळे जागतिक ऊर्जा संकट अधिक गडद झाले आहे. इराणकडून सवलती मिळवण्यासाठी आणि सध्याची कोंडी फोडण्यासाठी ट्रम्प हे जिनपिंग यांच्यावर दबाव टाकण्याची शक्यता आहे, कारण चीन हा इराणच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर लिहिले की, मी इराणच्या तथाकथित 'प्रतिनिधींचे' उत्तर वाचले आहे. मला ते अजिबात आवडलेले नाही, हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. 'ॲक्सिओस' या प्रसारमाध्यमाशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराण गेल्या ४७-५० वर्षांपासून अमेरिकेसोबत खेळ खेळत आहे. पण आता ते यापुढे हसू शकणार नाहीत, त्यांचे पत्र अयोग्य आहे आणि मला त्यांचा प्रतिसाद पटलेला नाही.

मोठी बातमी! ३ मे रोजी झालेली NEET-UG २०२६ परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या आरोपांनंतर CBI चौकशीचे आदेश

Mumbai : अग्निवीर व नियमित सैनिकांमध्ये समानता नाही; अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पेन्शन लाभ देण्याबाबत केंद्राचे स्पष्टीकरण

Pune : गदिमांची ‘पंचवटी’ वादाच्या भोवऱ्यात; कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नातवाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Navi Mumbai : महसूल बुडवणाऱ्या नंबरप्लेटचा गेम उघड; स्वत:च्या गाड्यांवर लावली दुसऱ्याची नंबरप्लेट

नवी मुंबईत उद्यापासून दोन दिवस पाणीबाणी; भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती होणार