वॉशिंग्टन : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या एपस्टीन फाइल्समधील हजारो पानांची कागदपत्रे आणि छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली असून त्यामधून अनेक मोठ्या लोकांची नावे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने लैंगिक तस्करीमधील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्या चौकशीशी संबंधित हजारो पानांचे कागदपत्रे आणि फोटो प्रसिद्ध केले आहेत.
राजकीय दबावानंतर काँग्रेसने मंजूर केलेल्या पारदर्शकता कायद्याअंतर्गत शुक्रवारी एपस्टीन फाइल्स प्रकाशित करण्यात आली. मात्र, यातील मोठा भाग अद्याप प्रकाशित व्हायचा असल्याने त्यामधून कोणत्या धक्कादायक बाबी उघड होतील याबाबतच्या तर्कवितर्काना उधाण आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन्ही पक्षांच्या खासदारांनी राजकीय दबाव टाकल्यामुळे एपस्टीन फाइल्स खुल्या करण्यात आल्या.
पारदर्शकता कायद्याअंतर्गत ही सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यात येत आहेत. जेफ्री एपस्टीन आणि त्याची ब्रिटिश प्रेयसी गिलॅन मॅक्सवेल यांच्या चौकशीतून समोर आलेली खळबळजनक माहिती या फाइल्समध्ये आहे. जेफ्री एपस्टीनला लैंगिक तस्करीच्या आरोपांखाली अटक झाली होती. अटकेत असताना २०१९ साली न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. त्याची प्रेयसी मॅक्सवेलला २०२१ साली दोषी मानण्यात आले होते, त्यानंतर तिला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली.
कोणाची नावे ?
बिल क्लिंटन अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे काही फोटो समोर आले आहेत. काही फोटोंमध्ये क्लिंटन स्वीमिंग पूल आणि हॉट टबमध्ये महिलांसोबत दिसत आहेत. क्लिंटन यांनी मात्र मागेच सर्व आरोप फेटाळले होते. २०१९ मध्ये त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते की, एपस्टाइनने केलेल्या भयानक गुन्ह्यांबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हती.
मायकेल जॅक्सन प्रसिद्ध दिवंगत पॉप गायक
मायकल जॅक्सन हा काही फोटोंमध्ये एपस्टीनबरोबर दिसून येतो. एका फोटोत मायकल जॅक्सन हा बिल क्लिंटन आणि डायना रॉस यांच्याबरोबर दिसून येत आहे.
मिक जंगर : संगीतकार आणि आघाडीचा गायक मिक
जंगर हा बिल क्लिंटन यांच्याबरोबर दिसून येत आहेत. त्यामध्ये एका महिलेचाही फोटो आहे. या महिलांचे फोटो गोपनियतेच्या कारणास्तव झाकण्यात आले आहेत. 'बीबीसी' ने जंगर यांच्या प्रतिनिधीशी प्रतिक्रिया मिळण्यासाठी संपर्क साधला होता. पण प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
अँडू माउंटबॅटन विंडसर, हाऊस ऑफ कार्ड्स या प्रसिद्ध वेबसिरीजचे अभिनेते केविन स्पेसी, विनोदी कलाकार ख्रिस टकर, माजी डचेस ऑफ यॉर्क सारा फर्ग्युसन, व्हर्जिन ग्रुपचे सह-संस्थापक रिचर्ड बॅन्सन, संगीतकार वॉल्टर क्रोनकाइट यांचीही नावे या यादीत आहेत.
फाइल्स काय दाखवतात आणि काय दाखवत नाहीत ?
एपस्टीन फाइल्समध्ये दाखवलेले अनेक फोटो तारीख आणि संदर्भाशिवाय दाखवले आहेत. पीडितांचे संरक्षण करण्यासाठी काहींचे चेहरे झाकण्यात आले आहेत. तसेच अपमानास्पद सामग्रीचे प्रकाशन केले जाणार नसून येत्या आठवड्यात आणखी काही माहिती प्रकाशित होण्याची शक्यता आहे.