आंतरराष्ट्रीय

जागतिक तापमानवाढ नियंत्रणाबाहेर; सरासरी तापमानात १.५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढ

सुमारे १०० ते १५० वर्षांपूर्वीपर्यंत अनेक शतके पृथ्वीचे सरासरी तापमान फारसे वाढले नव्हते. औद्योगिक क्रांतीनंतर या परिस्थितीत वेगाने बदल होत गेला

Swapnil S

लंडन : जागतिक सरासरी तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या खाली राखण्यात अनेक वर्षांनंतर २०२३ साली अपयश आले आहे. गतवर्षी जगाचे सरासरी तापमान नियोजित १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले. फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात पृथ्वीचे सरासरी तापमान १.५२ अंश सेल्सिअसने वाढल्याची माहिती युरोपीयन युनियनच्या (ईयू) कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने दिली आहे.

सुमारे १०० ते १५० वर्षांपूर्वीपर्यंत अनेक शतके पृथ्वीचे सरासरी तापमान फारसे वाढले नव्हते. औद्योगिक क्रांतीनंतर या परिस्थितीत वेगाने बदल होत गेला. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप, प्रदूषण, जंगलतोड, हरितगृह वायूंचे उत्सर्जन आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान बरेच वाढले आहे. सन १८५० ते १९०० या वर्षांमध्ये जागतिक सरासरी तापमानवाढ अर्धा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होती. ते प्रमाण १९४० ते १९८० दरम्यान अर्धा अंश सेल्सिअसपर्यंत आले. १९८० ते २००० या काळात दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान साधारण एक अंश सेल्सिअसने वाढत गेले. त्यानंतर हा वेग जवळपास दीड अंश सेल्सिअसपर्यंत वाढू लागला.

ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात पृथ्वीवरील वातावरण मानवी वस्तीसाठी पोषक राहणार नाही, ही बाब जगभरच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आली. त्यानंतर २०१५ साली पॅरिस येथे झालेल्या जागतिक हवामान बदलविषयक परिषदेत असे ठरले की, पृथ्वीची वार्षिक सरासरी तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याचे प्रयत्न करावेत. त्यानुसार जगभर वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. त्यांना यश येऊन गेल्या काही वर्षांत हे उद्दिष्ट गाठण्यात येत होते. मात्र, २०२३ साली त्यात खंड पडला. गतवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान दीड अंश सेल्सिअसपेक्षा अधिक दराने वाढले. पर्यावरणरक्षणाच्या भविष्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

अधिक तापमानवाढीला ‘अल-निनो’चा हातभार

पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप आणि जीवाष्म इंधनांचे ज्वलन ही जागतिक तापमानवाढीची महत्त्वाची कारणे होती. पण २०२३ साली त्यात हवामानाच्या 'अल-निनो' परिणामानेही हातभार लावला. सन २०२३ च्या मध्यापासून अल-निनो परिणाम प्रभावी होण्यास सुरुवात झाली आणि सध्याही त्याचा प्रभाव वाढत आहे. मात्र, अल-निनोमुळे जागतिक सरासरी तापमानवाढ फार तर ०.२ अंश सेल्सिअसपर्यंत होऊ शकते. बाकीच्या तापमानवाढीला मानवी हस्तक्षेप जबाबदार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी