एक्स (@bennyjohnson)
आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश; Google Maps ने बदलले Gulf of Mexico चे नाव, पण फक्त अमेरिकन नागरिकांसाठीच!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचे (Gulf of Mexico) नामांतर केल्यानंतर आता दिग्गज टेक कंपनी Google नेही आपल्या 'गुगल मॅप्स'वरील मेक्सिकोच्या आखाताचे (Gulf of Mexico) नाव अधिकृतपणे बदलले आहे.

Krantee V. Kale

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचे (Gulf of Mexico) नामांतर केल्यानंतर आता दिग्गज टेक कंपनी Google नेही आपल्या 'गुगल मॅप्स'वरील मेक्सिकोच्या आखाताचे नाव अधिकृतपणे बदलले आहे. ट्रम्प यांनी नामांतराच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर गुगलने मॅपवरील नाव 'अमेरिकेचे आखात' (Gulf of America) असे केले आहे. तथापि, हा बदल फक्त अमेरिकन वापरकर्त्यांसाठीच असेल. मेक्सिकन वापरकर्त्यांसाठी, ते मेक्सिकोचे आखातच राहील आणि उर्वरित जगासाठी, दोन्ही नावे दिसतील असे गुगलने सोमवारी जारी केलेल्या एका ब्लॉगद्वारे स्पष्ट केले आहे.

९ फेब्रुवारी रोजी Gulf of America दिवस साजरा करण्याची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प ‘एअर फोर्स वन’ विमानातून या आखाताजवळ असलेल्या न्यू ऑर्लिन्स येथील 'सुपर बाउल'मध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांनी नामांतराच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. येत्या ३० दिवसांत नाव बदलाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे त्यांनी अंतर्गत खात्याला आदेश दिले. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिकेच्या तटरक्षक दलाने तत्काळ ‘अमेरिकेचे आखात’ हे नामांतर केले आहे. ९ फेब्रुवारी रोजी Gulf of America दिवस साजरा करण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे.

कार्यकारी आदेशात नमूद केल्याप्रमाणे अमेरिकेच्या आखातामध्ये, मेक्सिको आणि क्युबाच्या सागरी सीमांपर्यंत विस्तारलेल्या टेक्सास, लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा आणि फ्लोरिडा यांच्या सीमेवर असलेल्या यूएस कॉन्टिनेंटल शेल्फ क्षेत्राचा समावेश आहे. अमेरिकेच्या व्यापार आणि विकासातील आखाताच्या ऐतिहासिक भूमिकेचा दाखला देत ट्रम्प यांनी नाव बदलाला या प्रदेशातील अमेरिकेच्या योगदानाची बहुप्रतीक्षित पावती असल्याचे म्हटले. "आपल्या महान राष्ट्रासाठी एकत्र येऊन हा महत्त्वाचा प्रसंग आणि अमेरिकेच्या आखाताचे नामकरण साजरे करणे योग्य आहे", असे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील तणाव वाढलेला असताना ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच अमेरिकेने मेक्सिकोवर २५ टक्के आयात शुल्क लादण्याची धमकी दिली होती. परंतु, मेक्सिकोने १० हजार नॅशनल गार्ड सैनिकांना सीमेवर पाठविण्यास सहमती दर्शवल्यानंतर कारवाईला विराम दिला आहे.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...