कैरो : होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याच्या निर्णयावर अमेरिकेच्या घोषणेनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला असून आजूबाजूच्या देशातील बंदरांवर हल्ले होतील, अशी धमकी दिली आहे. दरम्यान इंग्लंडने अमेरिकेच्या नाकेबंदीच्या इशाऱ्यावर टीका केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटनने पुढाकार घेण्याचे जाहीर केले आहे. यासाठी दोन्ही देश एका विशेष परिषदेचे आयोजन करणार असल्याची घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली.
होर्मूझची नाकेबंदी सोमवारपासून सकाळी १० वाजल्यापासून (इराणी वेळेनुसार संध्याकाळी ५:३०) सुरू होईल, असे अमेरिकेने जाहीर केले. इराणच्या बंदरांमध्ये येणाऱ्या किंवा तिथून बाहेर जाणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर ही कारवाई केली जाईल. मात्र, इराणच्या बंदरांशी संबंध नसलेल्या इतर व्यापारी जहाजांना या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी असेल.
दरम्यान, इराणवरील निर्बंधांचे उल्लंघन करून जे कोणी इराणकडून तेल खरेदी करतील किंवा त्याची विक्री करतील, त्यांच्यावर अमेरिका 'कडक कारवाई' करणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून, ट्रम्प यांनी 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' रोखण्याची घोषणा केल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या प्रतिबंधित तेलाची खरेदी किंवा विक्री करणाऱ्या कोणाही विरोधात न्याय विभाग कडक कायदेशीर खटले चालवेल. न्याय विभाग आमचे कमांडर-इन-चीफ आणि आमच्या लष्कराला पूर्ण पाठिंबा देत आहे.
या निर्णयामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची आणि युद्धाचा भडका पुन्हा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अमेरिकेच्या या घोषणेनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला असून पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातातील सर्व बंदरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी लष्करी निवेदनाचा हवाला देत म्हटले आहे की, पर्शियन आखातातील सुरक्षा ही एकतर सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीच नसेल. या भागातील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही.
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेली युद्धबंदीची प्रदीर्घ चर्चा शनिवारी कोणत्याही कराराशिवाय संपुष्टात आली. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स यांनी सांगितले की, इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्याची अमेरिकेची अट नाकारल्यामुळे चर्चा फिस्कटली. दुसरीकडे, इराणने २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि त्यांची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्याची मागणी केली आहे.
ट्रम्प विरुद्ध पोप
रविवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पोपनी "जहाल डाव्यांचे लाड करणे थांबवावे, असा सल्ला त्यांनी दिला होता. "मला असा पोप नको आहे ज्याला इराणकडे अण्वस्त्र असणे योग्य वाटते. पोप लिओ गुन्हेगारी रोखण्यात कमकुवत आहेत आणि परराष्ट्र धोरणातही ते वाईट आहेत," अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली होती.
या टीकेनंतर ट्रम्प यांनी स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये त्यांना येशू ख्रिस्तासारख्या दैवीशक्तींनी युक्त दाखवण्यात आले आहे. या चित्रात ट्रम्प एका रुग्णावावर हात ठेवून त्याला बरे करत आहेत आणि त्यांच्या बोटांतून प्रकाश बाहेर पडताना दिसत आहे, तर आसपासचे लोक आदराने त्यांच्याकडे पाहत आहेत.
दरम्यान, अमेरिकेत जन्मलेले पोप लिओ चौदावे यांनी ट्रम्प यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. व्हॅटिकनने केलेला शांतता आणि सलोख्याचा पुरस्कार हा बायबलमधील चांगल्या तत्त्वांवर आधारित आहेत आणि आपल्याला ट्रम्प प्रशासनाची अजिबात भीती वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.