आंतरराष्ट्रीय

अमेरिकी युद्धनौकेवर हुथींचा क्षेपणास्त्र हल्ला

Swapnil S

जेरुसलेम : येमेनमधील हुथी बंडखोरांनी शुक्रवारी रात्री एडनच्या आखाताजवळ अमेरिकेच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र डागले. याशिवाय हुथींनी ब्रिटनच्या मर्लिन लुआंडा नावाच्या खनिज तेलवाहू जहाजावरही क्षेपणास्त्र हल्ला केला. हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून इराणचे समर्थन असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्राच्या परिसरात इस्रायल आणि त्यांच्या मित्रदेशांच्या अनेक जहाजांवर हल्ला केला आहे. मात्र, हुथी बंडखोरांनी अमेरिकी युद्धनौकेवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एडनच्या आखाताजवळ तैनात असलेल्या यूएसएस कार्नी या युद्धनौकेच्या दिशेने हुथींनी क्षेपणास्त्र डागले. पण, अमेरिकी सेनादलांनी त्याला क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राने हवेतच पाडले. तसेच हुथींनी ब्रिटिश तेलवाहू जहाज मर्लिन लुआंडावरही क्षेपणास्त्राने हल्ला केला. त्यात त्या जहाजाला आग लागली. आगीत जहाजावरील कोणालाही दुखापत झाली नाही. अमेरिकी आणि ब्रिटिश युद्धनौका तेलवाहू जहाजाच्या मदतीला धावून गेल्या आहेत. हे जहाज मार्शल आयलंड्समध्ये नोंदणीकृत आहे आणि ते ब्रिटनमध्ये नोंदणी केलेल्या ओशनिक्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीकडून वापरले जात आहे. हुथी बंडखोरांचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरी यांनी यूएसएस कार्नीवरील हल्ल्याला दुजोरा दिला नाही. पण, ब्रिटिश तेलवाहू जहाजावर हल्ला केल्याचे मान्य केले.

आयएनएस विशाखापट्टणमची मदत

एडनच्या आखाताजवळ हुथींना हल्ला केल्याने आग लागलेल्या मर्लिन लुआंडा या ब्रिटिश तेलवाहू जहाजाच्या मदतीसाठी भारतीय नौदलाची आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका गेली आहे. मर्लिन लुआंडा जहाजावर २२ भारतीय आणि एक बांगलादेशी कर्मचारी होते. त्यांच्या मदतीसाठी आयएनएस विशाखापट्टणमवरील नौसैनिकांचे खास पथक मर्लिन लुआंडा जहाजावर उतरले आहे. जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस