इराणच्या गॅस प्रकल्पावर इस्रायलचा हल्ला, संतप्त इराणकडून कतारच्या मोठ्या गॅस प्रकल्पावर प्रतिहल्ला 
आंतरराष्ट्रीय

आता गॅस प्रकल्प लक्ष्य; इराणच्या गॅस प्रकल्पावर इस्रायलचा हल्ला, संतप्त इराणकडून कतारच्या मोठ्या गॅस प्रकल्पावर प्रतिहल्ला

इस्रायलने इराणच्या जगातील सर्वात मोठ्या साऊथ पार्स गॅस प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर इराणच्या संतापाचा उद्रेक झाला आणि इराणनेही कतारच्या सर्वात मोठ्या रास लाफान या गॅस प्रकल्पासह सौदी, कुवैत, यूएईमधील ऑईल रिफायनरी, गॅस सुविधांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले चढविले.

Swapnil S

दुबई : इस्रायलने इराणच्या जगातील सर्वात मोठ्या साऊथ पार्स गॅस प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर इराणच्या संतापाचा उद्रेक झाला आणि इराणनेही कतारच्या सर्वात मोठ्या रास लाफान या गॅस प्रकल्पासह सौदी, कुवैत, यूएईमधील ऑईल रिफायनरी, गॅस सुविधांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले चढविले. त्यामुळे मध्य-पूर्वेत गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता कमालीचा चिघळला आहे.

दरम्यान, इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हात झटकले असून या हल्ल्याची आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर इराणनेही कतारवर इस्रायलने बुधवारी दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले. साउथ पार्स हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र मानले जाते. यानंतर इराणने सौदी आणि कतारमधील उर्जा आणि गॅस प्रकल्पाची राख करू, असा इशारा दिला होता. यानंतर हा इशारा सत्यात उतरवत बुधवारी रात्री इराणने कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर, रास लाफानवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे भीषण आग लागली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन पथके तात्काळ पाठवण्यात आली. कतारने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे.

प्रत्येक रक्ताला किंमत

गॅस प्रकल्पावरील हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणने नागरिक आणि महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करून "रेड लाइन ओलांडली" आहे. अशा हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशातील परिस्थिती चिघळू शकते आणि म्हणूनच, सर्व देशांनी तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता टिकवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. दरम्यान, इराणचे नवीन सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी देताना प्रत्येक रक्ताला किंमत असते, असा इशारा दिला आहे.

ट्रम्प काय म्हणाले?

दरम्यान, ट्रम्प यांनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, मध्यपूर्वेत जे काही घडले, त्या रागातून इस्त्रायलने इराणमधील 'साउथ पार्स गॅस फिल्ड' या महत्त्वाच्या केंद्रावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात त्या केंद्राचा एक छोटा भाग बाधित झाला. या विशिष्ट हल्ल्याबद्दल अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. तसेच, कतार या देशाचा या हल्ल्याशी दूरान्वयेही संबंध नव्हता. दुर्दैवाने, इराणला ही वस्तुस्थिती माहित नव्हती. त्यामुळे इराणने विनाकारण आणि अन्यायकारक पद्धतीने कतारच्या 'एलएनजी गॅस' सुविधेवर हल्ला केला, असे ट्रम्प म्हणाले.

'साउथ पार्स'वर पुन्हा हल्ला नाही

आता इस्त्रायलकडून 'साउथ पार्स' क्षेत्रावर कोणताही पुढचा हल्ला केला जाणार नाही. पण, जर इराणने पुन्हा एकदा कतारसारख्या निष्पाप देशावर हल्ला करण्याचा चुकीचा निर्णय घेतला, तर अमेरिका स्वतः इस्त्रायलच्या मदतीशिवाय किंवा संमतीशिवाय इराणच्या संपूर्ण 'साउथ पार्स गॅस फिल्ड'ला अशा ताकदीने उडवून देईल, जी इराणने याआधी कधीही पाहिली नसेल. मला अशा प्रकारचा हिंसाचार किंवा विनाश करायचा नाही, कारण त्याचे इराणच्या भविष्यावर दीर्घकालीन परिणाम होतील. पण जर कतारच्या गॅस सुविधेवर पुन्हा हल्ला झाला, तर मी मागेपुढे पाहणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.

सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रावर हल्ला

दरम्यान, इस्त्रायलने दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात गॅससोबतच पेट्रोकेमिकल आणि तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते. इस्रायली माध्यमांनी बुशेहर प्रदेशातील एका गॅस सुविधेवर हल्ला झाल्याचेही वृत्त दिले आहे. यापूर्वी, इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले होते की, आज इराण आणि लेबनॉनमध्ये "मोठे अनपेक्षित हल्ले" अपेक्षित आहेत, ज्याचा संबंध या हल्ल्यांशी जोडला जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने आखाती देशांमध्ये मोठ्या हल्ल्यांचा इशारा दिला होता. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने लोकांना सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील प्रमुख तेल आणि वायू प्रकल्पांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

चार देशांच्या सुविधांवर हल्ले

इराणच्या क्षेपणास्त्रांनी कतारमधील मुख्य गॅस सुविधा असलेल्या 'रास लाफान'वर हल्ला केला. यामध्ये प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे, असे कतारने म्हटले आहे. तर कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की, कुवेत शहरापासून ५० किमी दक्षिणेला असलेल्या 'मिना अल-अहमदी' रिफायनरीवर ड्रोन हल्ला झाला. यामुळे एका ऑपरेशनल युनिटला आग लागली, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्याचप्रमाणे कुवेतच्या दक्षिणेकडील 'मिना अब्दुल्ला' रिफायनरीवरही ड्रोनने हल्ला केल्यामुळे तिथे आग लागल्याची माहिती कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिली. संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी रोखलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष पडल्यामुळे हबशान गॅस सुविधा आणि बाब ऑईलफिल्डमध्ये काही दुर्घटना घडल्या. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, यानबू बंदरावरील सौदी अरामकोच्या 'सामरेफ' रिफायनरीवर एक ड्रोन आदळले. या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज सध्या घेतला जात आहे.

किमतीत ३५ टक्के वाढ

दरम्यान, आखाती प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने गुरुवारी युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या किमतीत ३५ टक्के वाढ झाली. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, २८ फेब्रुवारी रोजी इराण युद्ध सुरू झाल्यापासून युरोपमध्ये वायूच्या किमती ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. जागतिक बेंचमार्क मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीही आज प्रति बॅरल ११२ डॉलरपर्यंत वाढल्या. युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती ४८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. १३ मार्चपासून त्याची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आलेली नाही. मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाचा ऊर्जा पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामाबाबत अनिश्चितता वाढतच आहे.

भारताच्या वायू पुरवठ्यावर परिणाम

कतार हा भारताला द्रव नैसर्गिक वायू (LNG) पुरवणारा एक प्रमुख देश आहे. भारताच्या एकूण एलएनजी आयातीमध्ये कतारचा वाटा अंदाजे ४०% ते ४७% आहे. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे, विशेषतः कतारच्या 'रास लफान' प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यांमुळे या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याची झळ पेट्रोनेट एलएनजी आणि गेल यांसारख्या प्रमुख कंपन्यांना बसणार आहे, ज्यांनी कतारी वायू आयातीसाठी दीर्घकालीन करार केले आहेत.

आजचे राशिभविष्य, ८ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद

World Brain Tumor Day 2026 : सततचा थकवा, डोकेदुखीकडे दुर्लक्ष करताय? मेंदूतील ट्यूमरची असू शकतात 'ही' लक्षणे; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

एलिगंट मेकअप आणि रॉयल गाऊन; करिश्मा कपूरचा स्टनिंग लूक व्हायरल

World Bicycle Day : रोज फक्त ३० मिनिटं सायकल चालवा, शरीराला होतील 'हे' फायदे