तेल अवीव : गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायल-हमासमध्ये शस्त्रसंधी करार लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती इस्रायली प्रसारमाध्यमांनी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली.
इस्रायल-हमास शस्त्रसंधीतील करारानुसार, पहिल्या टप्प्यात ३३ अपहृतांची सुटका करण्यात येणार आहे. यात लहान मुले, महिला, महिला सैनिक, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची सुटका होऊ शकते.
‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोहा येथे अपहृतांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या चर्चेत प्रगती झाली असून कराराला अद्याप अंतिम स्वरूप दिले गेलेले नाही. आता ‘हमास’कडून या कराराला मंजुरी मिळवण्याचे काम सुरू आहे.
दोहा येथे कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी बैठकीनंतर ‘हमास’ने सांगितले की, गाजा शस्त्रसंधीची चर्चा योग्यरीतीने पुढे जात आहे.
शस्त्रसंधीचे १५ दिवस झाल्यानंतर १६ व्या दिवसानंतर करारावर पुढील टप्प्याची चर्चा सुरू होईल. सर्व अपहृतांची सुटका करणे व इस्रायली सैन्य दल पूर्णपणे परत बोलवणे आदी लक्ष्य ठेवले जाईल. पहिला टप्पा ४२ दिवस चालेल. पण, अखेरचा अपहृत नागरिक इस्रायलला परतत नाही, तोपर्यंत इस्रायली सैन्य गाझातून पूर्णपणे मागे येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने २५१ जणांचे अपहरण केले होते. त्यापैकी ९४ जण गाझात आहेत.