दुबई : गाझा पट्टीतील युद्धविरामाच्या अमेरिकन प्रस्तावाचा विचार करत असताना इस्रायलने मंगळवारी कतारमध्ये हमासच्या नेतृत्वावर हल्ला केला. अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतारच्या भूभागावर झालेल्या या कारवाईमुळे मोठा तणाव निर्माण झाला असून युद्ध थांबवण्याच्या आणि बंदिवानांची सुटका करण्याच्या चर्चांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कतारने अनेक वर्षे इस्रायल-हमासदरम्यान मध्यस्थी केली आहे. दोहावर हल्ला झाल्यानंतर कतारने या हल्ल्याला “आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे उघड उल्लंघन” म्हटले आहे. इस्रायलने ‘हमास’ नेत्यांना कुठेही ठार मारण्याची धमकी पूर्वीपासून दिली होती. कतारने मध्यस्थाची भूमिका निभावली असली तरी त्याने हमासवर पुरेसा दबाव आणला नाही, असा आरोप इस्रायलने वारंवार केला आहे.
या हल्ल्याची जबाबदारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्वीकारली. जेरुसलेममधील गोळीबारात सहा जण ठार झाल्यानंतर आणि गाझामध्ये चार सैनिक मारल्यानंतर सोमवारी हा निर्णय घेण्यात आला.