आंतरराष्ट्रीय

हल्ले-प्रतिहल्ले सुरूच; ...अन्यथा तेहरान जाळून टाकू, इस्रायलची इराणला धमकी

इस्रायल-इराणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी संघर्ष सुरू आहे. गेल्या २४ तासांत इराणमध्ये १३८ जण ठार, तर ३५० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याला इराणने शुक्रवारी रात्री जोरदार प्रत्युत्तर दिले. इस्रायलवर इराणने १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यातील ६ क्षेपणास्त्रे इस्रायलची राजधानी तेल अवीववर पडली ज्यात तीन जणांचा मृत्यू, तर ९० जण जखमी झाले.

Swapnil S

तेल अवीव/तेहरान : इस्रायल-इराणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी संघर्ष सुरू आहे. गेल्या २४ तासांत इराणमध्ये १३८ जण ठार, तर ३५० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याला इराणने शुक्रवारी रात्री जोरदार प्रत्युत्तर दिले. इस्रायलवर इराणने १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यातील ६ क्षेपणास्त्रे इस्रायलची राजधानी तेल अवीववर पडली ज्यात तीन जणांचा मृत्यू, तर ९० जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर इस्रायल संतापला असून इराणने क्षेपणास्त्र हल्ले न थांबवल्यास तेहरान जाळून टाकू, अशी धमकी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दिली. दोन्ही देशांच्या संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

इस्रायलने शनिवारी इराणवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. इराणच्या वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, हे हल्ले इराणच्या लोरेस्तान, हमेदान व करमानशाह येथे झाले. या भागात इराणचा संरक्षण व लष्करी तळ आहे. तसेच असदाबाद येथे एका क्षेपणास्त्र तळावर झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले.

दरम्यान, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ जवान जखमी झाल्याचे इस्रायली सैन्याने जाहीर केले. या जवानांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले.

इस्रायलचा नागरी विमानतळ बंद

इराणशी सुरू असलेल्या संघर्षानंतर इस्रायलने आपल्या देशातील सर्वात मोठा बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील आदेश येईपर्यंत बंद केला आहे.

भारतीय नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

इस्रायलमधील भारतीय दूतावासाने शनिवारी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. इस्रायली सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षेबाबतच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले. नागरिकांनी ठोस कारणाशिवाय प्रवास करू नये. तसेच सुरक्षा निवाऱ्याजवळ राहावे, असे आवाहन केले.

चीनने इस्रायलला फटकारले

संयुक्त राष्ट्रात चीनचे राजदूत फू कांग यांनी इराणवर हल्ला केल्याप्रकरणी इस्रायलला फटकारले. हा हल्ला म्हणजे, इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. इराणच्या अणुतळांवर हल्ला झाल्याने आम्ही चिंतित आहोत. इस्रायलने पुन्हा आपली मर्यादा ओलांडली आहे, असे ते म्हणाले.

इराणच्या आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या गुप्तचर विभागाचे उपप्रमुख गुलाम रेजा मेहराबी व उपपरिचलन प्रमुख मेहदी रब्बानी ठार झाले. आतापर्यंत इराणी लष्कराच्या चार अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

पाश्चात्य देशांना इराणचा इशारा

इराणने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाश्चात्य देशांनी जर इस्रायलला मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर पाश्चात्य देशांनी इस्रायलवर होणारे इराणी हल्ले रोखण्यास मदत केली तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या सैन्य ठिकाणांवर आणि त्यांच्या युद्धनौकांवर हल्ला करण्यात येईल, असा इशारा इराणने दिला.

हुकूमशाही उखडून टाका - नेत्यानाहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणच्या जनतेला हुकूमशाही सत्ता उखडून फेकण्याचे आवाहन केले आहे. नेत्यानाहू यांनी लोकांना हुकूमशाहीविरोधात उभे राहा. इस्रायलची लढाई तुमच्याशी नाही तर तिथल्या हुकूमशाही सत्तेशी आहे. इस्रायलची सैन्य कारवाई इराणच्या लोकांना स्वातंत्र्यासाठी मार्ग मोकळा करेल, असे त्यांनी म्हटले.

इस्रायलसाठी नरकाचा दरवाजा उघडला - खामेनी

इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी संतापले. इस्रायलने युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे आता तो युद्धातून बाहेर पडू शकत नाही. इस्रायलसाठी नरकाचे दरवाजे उघडतील. आम्ही त्यांना बरबाद करू, अशी धमकी खामेनेई यांनी दिली आहे.

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा

आयडीएफचे प्रमुख इयाल जमीर, मोसादचे संचालक डेविड बर्निया, इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, इराणने इस्रायली नागरिकांवर क्षेपणास्त्र डागल्यास राजधानी तेहरान जाळून टाकू. इराणी हुकूमशहा इराणच्या नागरिकांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video