कामी रिता शेर्पाकडून ३२ वेळा एव्हरेस्ट सर; स्वतःचाच जागतिक विक्रम मोडला (Photo- X)
आंतरराष्ट्रीय

कामी रिता शेर्पाकडून ३२ वेळा एव्हरेस्ट सर; स्वतःचाच जागतिक विक्रम मोडला

नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी रविवारी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर ३२ व्यांदा यशस्वी चढाई करून विक्रम घडवला आहे.

Swapnil S

काठमांडू : नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी रविवारी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर ३२ व्यांदा यशस्वी चढाई करून विक्रम घडवला आहे. त्यांनी स्वतःचाच सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. ‘एव्हरेस्ट मॅन’ अनुभवी गिर्यारोहक कामी रिला शेर्पा सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी ८,८४८.८६ मीटर उंच शिखरावर पोहोचले, अशी माहिती येथील पर्यटन विभागाने दिली आहे.

ते ‘१४ पीक्स एक्स्पेडिशन’ अंतर्गत एका मोहिमेचे नेतृत्व करत होते. एव्हरेस्ट बेस कॅम्प येथील पर्यटन विभागाच्या क्षेत्र कार्यालयाने या यशस्वी चढाईला दुजोरा दिला असल्याचे ‘द काठमांडू पोस्ट’ने वृत्त दिले आहे.

कोशी प्रांतातील सोलुखुंबू जिल्ह्यातील थामे गावात जानेवारी १९७० मध्ये जन्माला आलेल्या कामी रिला यांनी १९९२ मध्ये व्यावसायिक गिर्यारोहक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा माऊंट एव्हरेस्ट सर केले होते.

पर्यटन विभागाने शेर्पा यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, त्यांची ही कामगिरी नेपाळच्या गिर्यारोहण क्षेत्रासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कामी रिता यांनी यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये प्रत्येकी दोनदा एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यांनी २७ मे २०२५ रोजी ३१ व्यांदा हे शिखर सर केले होते. १९९४ ते २०२५ दरम्यान कामी रिला यांनी प्रत्येकी एकदा ‘के-२’ आणि माऊंट ल्होत्से, तीनदा मनास्लू आणि आठवेळा चो ओयू हे ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीचे पर्वत सर केले आहेत.

याच मोहिमेदरम्यान ‘माऊंटन क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या नेपाळी महिला ल्हाकपा शेर्पा यांनी रविवारी ११ व्यांदा यशस्वी चढाई करून स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढला. त्या सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी शिखरावर पोहोचल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.

नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी गिर्यारोहकांचे अभिनंदन केले असून, असे ऐतिहासिक यश केवळ अढळ धैर्य, कठोर आत्मशिस्त आणि कामाप्रती प्रामाणिक समर्पणातूनच साध्य होऊ शकते, असे म्हटले आहे.

शाह यांनी नेपाळच्या गिर्यारोहण इतिहासातील शेर्पा समुदायाच्या योगदानाचा अद्भूत आणि अतुलनीय असा गौरव केला. शेर्पा हे हिमालयातील खरे पडद्यामागील नायक आहेत, त्यांच्या धैर्याशिवाय, ज्ञानाशिवाय आणि कष्टाशिवाय पर्वतांचे वैभव अपूर्ण राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

नेपाळ माऊंटनिएरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंग त्शेरिंग शेर्पा यांच्यासह इतर सहकाऱ्यांनीही कामी रिला यांचे अभिनंदन केले आहे. आशियाई माउंटनिएरिंग अँड क्लायंबिंग फेडरेशनचे मावळते अध्यक्ष अंग त्शेरिंग यांनी सांगितले की, कामी रिता हे केवळ एक मजबूत गिर्यारोहक नसून त्यांच्याकडे गिर्यारोहण क्षेत्रातील उत्तम तांत्रिक कौशल्य आहे. एक खंबीर आणि समर्पित गिर्यारोहक असल्याशिवाय कोणीही ३२ वेळा एव्हरेस्ट सर करू शकत नाही.

७५०० जणांकडून एव्हरेस्ट सर

आतापर्यंत ७,५०० पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर केले आहे, तर चढाई करताना किंवा उतरताना या धोकादायक भूप्रदेशात ३०० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी