माद्रिद : पोर्तुगालहून ग्रीसला जाणारी नौका पाच किलर व्हेलनी हल्ला करून बुडवली. या नौकेची किंमत एक कोटी रुपये असून, भूमध्य समुद्रात किलर व्हेल ऑर्कासनी या नौकेला घेरले व हल्ला करून बुडवले. २४ जुलैला ही घटना घडल्याची माहिती नुकतीच उघड झाली.
रॉबर्ट पॉवेल (५९) हे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मित्रांसोबत १० दिवसांच्या सहलीवर गेले होते. व्हेलच्या एका गटाने प्रवास सुरू केल्यानंतर २२ तासांनी ३९ फूट लांबीच्या या नौकेवर हल्ला केला. त्यांनी नौकेला चारही बाजूंनी वेढा घातला. यानंतर त्यांनी नौकेला धडक देण्यास सुरुवात केली.
सुमारे दीड तास सतत हल्ला केल्यानंतर नौकेचा खालचा भाग हे धक्के सहन करू शकला नाही आणि त्याचे दोन तुकडे झाले. त्यामुळे नौकेत पाणी भरू लागले. हल्ला झाला तेव्हा ही नौका स्पेनच्या किनाऱ्यापासून फक्त २ मैलांवर होती. हल्ल्यानंतर नौकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी अलर्ट पाठवला. सुमारे दोन तासांनंतर एक स्पॅनिश जहाज त्यांच्या मदतीसाठी पोहोचले. त्यांनी क्रू मेंबर्सची सुटका केली. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच ही नौका भूमध्य समुद्रात १३० फूट खोल बुडाली.
ऑर्कस नौकेच्या सर्वात असुरक्षित भागांना लक्ष्य करत होते. ते जेव्हा पहिल्यांदा नौकेशी आदळले तेव्हा एक मोठा दगड नौकेला आदळल्यासारखे वाटले. यानंतर किलर व्हेलनी आपला हल्ला तीव्र केला. किलर व्हेल लांडग्यांसारखे नौकेवर तुटून पडले होते, असे पॉवेल यांनी सांगितले. व्हेलना पिटाळण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी फटाके पाण्यात सोडले, जेणेकरून स्फोट झाल्याने व्हेल पळून जातील. यानंतर त्यांनी नौकेचे इंजिन बंद केले. तरीही, किलर व्हेलनी हल्ला करणे सुरूच ठेवले.
दोन महिन्यांपूर्वी ५० फुटांची नौका बुडाली
किलर व्हेलच्या एका गटाने याआधी मे महिन्यात देखील मोरोक्कोजवळ ५० फूट लांबीची नौका बुडवली होती. याशिवाय ऑर्कसने नौकानयन शर्यतीवरही हल्ला केला. शर्यतीदरम्यान एक बोट नेदरलँडहून इटलीला जात होती. १५ मिनिटे व्हेलशी झुंज दिल्यानंतर, क्रूने शेवटी हार मानली आणि मदत मागितली. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ऑर्कास ही डॉल्फिनची सर्वात मोठी प्रजाती आहे. ते काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असतात. ते मासे, पेंग्विन, सील आणि इतर समुद्री प्राणी खातात. ऑर्कस मुख्यतः गट बनवून हल्ला करतात.