आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये आगडोंब! संसद, राष्ट्रपती भवन आणि मंत्र्यांची घरे जाळली

सोशल मीडियावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ आणि सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘झेन झेड’ तरुणांनी सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी संसदेची इमारत, राष्ट्रपती भवन, मंत्र्यांचे खासगी बंगले पेटवून दिले.

Swapnil S

काठमांडू : सोशल मीडियावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ आणि सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘झेन झेड’ तरुणांनी सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी संसदेची इमारत, राष्ट्रपती भवन, मंत्र्यांचे खासगी बंगले पेटवून दिले. राजधानी काठमांडू व परिसरातील हिंसाचारात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ४०० जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी सरकारी शस्त्रे लुटली. तसेच काठमांडूत आंदोलकांच्या हल्ल्यात ३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, माजी पंतप्रधान पुष्प कमल दहाल, माजी गृहमंत्री रमेश लेखाक, माजी पंतप्रधान शेरबहादुर देउबा आणि दूरसंचार मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरांवरही हल्ले झाले.

विमान सेवा स्थगित

आंदोलकांनी देशभरात मोर्चे काढले. त्यामुळे काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा आंशिकपणे स्थगित करण्यात आली. दरम्यान, एअर इंडियाने आपली नेपाळमध्ये जाणारी काही विमाने मंगळवारी रद्द केली.

देशाची एकात्मता कायम ठेवा - लष्कर

नेपाळच्या लष्कराने आंदोलनकर्त्यांना आवाहन केले की, देशाचे स्वातंत्र्य व एकता कायम ठेवा. आम्ही जनतेच्या जीवितांचे व मालमत्तेचे संरक्षण करत राहू. आमची ‘झेन झेड’ आंदोलनावर पूर्ण नजर आहे. जनतेचे व संपत्तीच्या नुकसानीमुळे आम्हाला दु:ख होत आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत देशाचा पुरातन वारसा, सांस्कृतिक व राष्ट्रीय वास्तूंचे जतन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे लष्कराने म्हटले आहे.

सरकारने सोमवारी रात्री सोशल मीडियावरील बंदी उठवली तरी आंदोलकांचे आंदोलन सुरूच राहिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईची आणि पोलीस कारवाईतील मृत्यूस जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

काठमांडूच्या कालनकी, कालीमाटी, तहाचल, बानेश्वर भागात तसेच ललितपूर जिल्ह्यातील च्यासल, चपगाव, थेचो येथे आंदोलने झाली. सकाळपासून टायर जाळून रस्ते अडवले गेले. ललितपूरमधील सुनकोठी येथे मंत्री गुरूंग यांच्या घरावर दगडफेक झाली. देउबा यांच्या घराचेही नुकसान करण्यात आले.

सरकारने फेसबुक आणि 'एक्स'सह २६ सोशल मीडिया साइट्स बंद केल्या होत्या. नंतर सार्वजनिक संताप पाहता ही बंदी हटवण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी आणि राजकारण्यांसाठी निवृत्ती वयाची अट लागू, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

बालेन शाह यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी

नेपाळमध्ये आंदोलनकारी सोशल मीडियाच्या सहाय्याने बालेन शाह यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी करत आहेत. शाह सध्या काठमांडूचे महापौर आहेत.

दरम्यान, नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी नेपाळमध्ये जाऊ नये, असा सल्ला भारत सरकारने दिला आहे. जे नागरिक नेपाळमध्ये आहेत. त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे. रस्त्यावरून प्रवास करताना सावध राहा. नेपाळचे स्थानिक प्रशासन व काठमांडूतील भारतीय दूतावासाच्या सल्ल्याचे पालन करावे.

माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले

माजी पंतप्रधान झालनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर यांना जमावाने जिवंत जाळले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे, तर माजी पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. तसेच अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडू येथील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून त्यांच्या छातीवर लाथा मारण्यात आल्या.

१५०० कैदी फरार

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रबि लामिछाने यांच्या सुटकेनंतर ललितपूरच्या नक्खू तुरुंगातून १५०० कैदी फरार झाले आहेत. कैदी सुटल्याने जनतेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

पंतप्रधान ओली यांचा राजीनामा

देशातील हिंसाचारामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी नेले आहे. पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याच्या काही तास आधी आंदोलकांनी त्यांचे बानेश्वरजवळील खासगी घर जाळले. शेकडो आंदोलकांनी पंतप्रधान ओलींच्या कार्यालयावर हल्ला करून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. त्यानंतर ७३ वर्षीय ओली यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती पौडेल यांच्याकडे सादर केला. ‘नेपाळसमोर उभ्या असलेल्या असामान्य परिस्थितीत मी संवैधानिक आणि राजकीय मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा देत आहे,’ असे पंतप्रधान ओली यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे.

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी