काठमांडू : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये समाज माध्यमांवरील अनेक प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आल्याने ‘जनरेशन-झेड’च्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्याचे हिंसक पडसाद सोमवारी काठमांडूत उमटले. देशातील तरुणाई या बंदीविरुद्ध आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरली असून संतप्त युवावर्ग देशाच्या संसदेतही घुसला आहे. हिंसक आंदोलनामुळे निदर्शकांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून काही ठिकाणी संचारबंदीही जारी करण्यात आली आहे. नेपाळमध्ये सोशल मीडियावर आणलेल्या बंदीमुळे युवकांनी जोरदार निदर्शने सुरू केली असून तरुण पिढी सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनाला "जेन झी रिव्होल्यूशन" असे नाव देण्यात आले आहे. यात तरुण, विद्यार्थी आणि नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे हे आंदोलन सुरू झाले.
संसद भवनाला घेराव
नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटर यासारख्या जवळपास २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे. सुरुवातीला या बंदीविरोधात चर्चा घडत होती. पण हळूहळू युवक रस्त्यावर उतरले आणि मोठ्या प्रमाणात निदर्शने करू लागले. हजारो आंदोलक संसद भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्सही तोडले आहेत.
कर्फ्यू, अश्रुधुर, पोलिसांवर हल्ला
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काठमांडूमध्ये कर्फ्यू लावला आहे. संसद भवनाच्या आसपास आणि राजधानीत सुरक्षारक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याचा मारा केला. पण संतप्त तरुणांनी झाडांच्या फांद्या आणि पाण्याच्या बाटल्यांनी पोलिसांवर हल्ला केला. काही आंदोलकांनी संसद परिसरात प्रवेशही केला. आंदोलक विद्यार्थी राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती निवास, पंतप्रधान निवास आणि सिंह दरबार यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जमले आहेत.
सरकारचा सोशल मीडियावर बंदीचा निर्णय
ओली सरकारने ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब यांसारख्या २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आहे. सरकारने या बंदीचे कारण देताना सांगितले की, "या प्लॅटफॉर्म्सनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात नोंदणी केली नाही. त्यामुळे हे पाऊल नियामक प्रक्रियेचा भाग आहे." पण आंदोलक याला सेन्सॉरशिप आणि लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मानत आहेत. इंटरनेट आणि मोबाइल सेवा वारंवार बंद असूनही तरुणांनी वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.
नेपाळमधील ‘जेन-झेड’ आंदोलन हे सरकारच्या एका निर्णयानंतर पेटले. आजच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या हातात नेपोटिजम आणि भ्रष्टाचारविरोधी फलकही होते. त्यावरून नेपाळमधील तरूण पिढी ही देशातील भ्रष्टाचार आणि परिवारवाद याच्याविरूद्ध आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधानांच्या घरावर दगडफेक, संसदेचे प्रवेशद्वार पेटविले
काठमांडूमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर, आंदोलकांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या दमक येथील घरावर दगडफेक केली. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर धडक देत संसदेच्या प्रवेशद्वाराची तोडफोड करत प्रवेशद्वार पेटवून दिले. काही आंदोलक संसदेतही घुसले आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
गृहमंत्री लेखाक यांचा राजीनामा
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री रमेश लेखाक यांनी नेपाळमधील परिस्थिती चिघळल्याबद्दल त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे नेपाळ काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.