आंतरराष्ट्रीय

तीन वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचे नोबेल; मानवी रोगप्रतिकारक शक्तीवर संशोधन

मानवी रोगप्रतिकारक शक्तीतील ‘परिफेरल इम्यून टॉलरन्स’ या शोधासाठी मेरी ई. ब्रंकॉ, फ्रेड राम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना यंदाचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

Swapnil S

स्टॉकहोम : मानवी रोगप्रतिकारक शक्तीतील ‘परिफेरल इम्यून टॉलरन्स’ या शोधासाठी मेरी ई. ब्रंकॉ, फ्रेड राम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना यंदाचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

मेरी ब्रंकॉ या सिएटलमधील इन्स्टिट्यूट फॉर सिस्टिम्स बायोलॉजी येथे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक आहेत. राम्सडेल हे सॅन फ्रान्सिस्कोस्थित सोनोमा बायोथेरप्युटिक्सचे वैज्ञानिक सल्लागार आहेत, तर साकागुची हे जपानच्या ओसाका विद्यापीठाच्या इम्युनॉलॉजी फ्रंटियर रिसर्च सेंटरमध्ये प्राध्यापक आहेत.

मानवी रोगप्रतिकारक शक्तीत जीवाणू, विषाणू आणि इतर हानिकारक घटक ओळखून त्यांचा सामना करण्यासाठी विविध स्तरांवरील यंत्रणा असतात. यात ‘टी सेल्स’ नावाच्या महत्त्वाच्या पेशी या प्रक्रियेत प्रमुख भूमिका बजावतात. काही वेळा या पेशी चुकीने शरीरावरच हल्ला करू लागतात आणि प्रतिकारशक्तीच्या चुकांमुळे होणारे आजार उद्भवू शकतात.

नोबेल समितीने सांगितले की, या संशोधनाची सुरुवात १९९५ मध्ये साकागुची यांच्या "रेग्युलेटरी टी सेल्स" (टी-रेग्स) नावाच्या एका नव्या प्रकारच्या टी सेलच्या शोधाने झाली. २००१ मध्ये ब्रंकॉ आणि राम्सडेल यांनी ‘फॉक्स पी ३’ नावाच्या पेशीत झालेला म्युटेशन शोधले. जो दुर्मिळ मानवी ऑटोइम्यून आजारांशी संबंधित आहे.

दोन वर्षांनंतर, साकागुची यांनी या दोन्ही शोधांचा संबंध उलगडून दाखवला. ‘फॉक्स पी ३’ जीन हे रेग्युलेटरी ‘टी सेल्स’च्या विकासाचे नियंत्रण करते. हे टी-सेल्स’ इतर अति-प्रतिक्रियाशील ‘टी सेल्स’ना आळा घालण्याचे कार्य करतात.

या संशोधनामुळे ‘रोगप्रतिकारशक्ती’ या शास्त्रातील एक नवे क्षेत्र खुले झाले आहे. जगभरातील संशोधक सध्या रेग्युलेटरी टी सेल्सच्या आधारे ऑटोइम्यून आजार आणि कर्करोगावरील उपचार विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत.

नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सांगितले की, त्यांनी सोमवारी सकाळी साकागुची यांच्याशी लॅबमधून फोनवर संपर्क साधला. त्यांना ही बातमी ऐकून अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी याला अप्रतिम सन्मान म्हटले, असे पर्लमन म्हणाले. या तिघांना १.१ कोटी स्वीडिश क्रोनर (सुमारे १.२ दशलक्ष अमेरिकी डॉलर) ही बक्षीस रक्कम समान वाटली जाणार आहे.

रोगप्रतिकारक प्रणालीचे कार्य उघड

त्यांच्या शोधांमुळे रोगप्रतिकारक प्रणाली कशी कार्य करते आणि आपण सर्वजण गंभीर ‘ऑटोइम्यून’ आजारांनी का ग्रस्त होत नाही, हे समजण्यासाठी निर्णायक योगदान मिळाले आहे, असे नोबेल समितीचे अध्यक्ष ओली कॅम्पे यांनी सांगितले.

FICCI FRAMES 2025 : "सर, तुम्ही संत्री कशी खातात?"अक्षय कुमारचा फडणवीसांना मजेशीर सवाल; मुख्यमंत्र्यांनी दिलं 'ओजी नागपूरकर' उत्तर

CJI अवमान प्रकरण : शरद पवार गटाचे संविधान सन्मान आंदोलन; रोहित पवार म्हणाले, ''मनुवादी प्रवृत्ती...

Thane : मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर, तर ३१ डिसेंबरपर्यंत मेट्रो ४ सुरू करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

ठाणेकरांवर पाणीकपातीचे संकट; तीन दिवस १० टक्के पाणीकपात; नागरिकांना काटकसरीने वापराचे आवाहन

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा; प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे MMRDA ला निर्देश