मॉस्को : रशिया-युक्रेनमध्ये कैद्यांची अदलाबदल होत असतानाच रशियाने युक्रेनवर ३६७ ड्रोन व क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन मुलांचा समावेश आहे, तर अनेकजण जखमी झाले.
युक्रेनने दावा केला की, त्यांच्या हवाई दलाने रशियाचे २६६ ड्रोन व ४५ क्षेपणास्त्रे उडवली. या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले. रशिया युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला करत आहे. या हल्ल्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जबाबदार आहेत, असा आरोप युक्रेनच्या अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. अमेरिका व जगाचे मौन हे पुतीन यांचे मनोबल वाढवत आहे. जगाच्या दबावाशिवाय काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रपती पुतीन थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे थोडक्यात बचावले आहेत. पुतीन यांचे हेलिकॉप्टर पाडण्याचा प्रयत्न युक्रेनने केला, असा दावा रशियाने केला आहे. रशियन हवाई दलाचे मेजर जनरल युरी डॅशकिन यांनी सांगितले की, पुतीन हे २० मे रोजी कुर्स्कच्या दौऱ्यावर गेले होते. याचवेळी युक्रेनी हवाई दलाने पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर ४६ ड्रोनने हल्ले केले. पण, आम्ही सगळे ड्रोन उडवले. आम्ही राष्ट्रपतींना सुरक्षित ठेवले.