मॉस्को : आपल्या दोन प्रमुख अटी मान्य केल्यास युक्रेनशी सुरू असलेले युद्ध थांबविण्याचे आदेश त्वरित देतो आणि चर्चेला सुरुवात करतो, असे आश्वासन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी दिले.
मॉस्कोशी २०२२ मध्ये संलग्न करण्यात आलेल्या चार प्रदेशातून युक्रेनने सैन्य माघारी घ्यावे आणि ‘नाटो’मध्ये प्रवेश करण्याची योजना सोडून द्यावी, या अटी पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या आहेत.
दरम्यान, युक्रेन या अटी मान्य करण्याची शक्यता नसून त्यांना ‘नाटो’त सहभागी होण्याची इच्छा आहे. उलटपक्षी रशियानेच आपल्या प्रदेशातून सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे.
इटलीमध्ये ‘जी-७’ बैठक सुरू असून स्वित्झर्लंडने रशिया वगळून जगातील बहुसंख्य देशांतील नेत्यांची, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे प्रस्तावित केल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी वरील आश्वासन दिले आहे.