आंतरराष्ट्रीय

शरीफ, भुट्टो आघाडी सरकार स्थापण्याच्या तयारीत; इम्रान यांच्या पक्षातर्फे देशव्यापी निदर्शनांची हाक

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने तेथे सरकार स्थापनेसाठी जोडतोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाने आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) आघाडी सरकार स्थापनेसाठी चाचपणी सुरू केली आहे, तर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत देशव्यापी निदर्शनांची हाक दिली आहे. दरम्यान, गैरव्यवहार झालेल्या मतदारसंघांत फेरनिवडणूक घेणार असल्याची घोषणा पाकिस्तान निवडणूक आयोगाने केली आहे.

पाकिस्तानमध्ये गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात इम्रान खान यांचा पीटीआय पक्ष आणि त्यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी १०१ जागी विजय मिळवला आहे. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ७५ आणि भुट्टो यांच्या पीपीपीला ५४ जागा मिळाल्या आहेत. मुत्तहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तानला (एमक्यूएम-पी) १७ आणि अन्य लहान पक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत. गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे एका मतदारसंघातील निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला २६५ पैकी १३३ जागांचा आकडा कोणताच पक्ष गाठू शकलेला नाही.

त्यामुळे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. शरीफ आणि भुट्टो यांनी तशी तयारी दाखवली असून आघाडी सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नवाझ शरीफ यांनी त्यांचे बंधू शहबाज शरीफ यांच्यावर आघाडी स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांबरोबर वाटाघाटी करण्याची जबाबदारी सोपवली आहे, तर बिलावल भुट्टो यांनी पुढील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी लाहोर आणि इस्लामाबादमध्ये पक्षनेत्यांच्या बैठकी आयोजित केल्या आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाचे चेअरमन गौहर अली खान यांनी दावा केला आहे की, देशाचे अध्यक्ष अरिफ अलवी त्यांच्याच पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील.

सबुरीचा सल्ला

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेली पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसुफझाई यांनी देशवासीयांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानला मुक्त आणि नि:पक्षपाती निवडणुकांची गरज असून निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांनी दिलेला कौल उमदेपणाने स्वीकारावा, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी म्हटले की, देशातील राजकारण्यांनी प्रगल्भता दाखवली पाहिजे. सध्या आपण अराजकता आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणातून बाहेर पडावे आणि देशहितासाठी एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन करावे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त