प्रातिनिधिक छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

चीनमध्ये ‘कोरोना २.०’ची दहशत; रुग्णालयात रांगा, लहान मुलांना अधिक धोका

२०२० मध्ये जगात पसरलेल्या कोविडच्या आठवणी ताज्या असतानाच पाच वर्षांत पुन्हा नवीन विषाणूचे संक्रमण चीनमध्ये पसरले आहे. कोरोना विषाणूप्रमाणेच याची लक्षणे आहेत.

Swapnil S

बीजिंग : २०२० मध्ये जगात पसरलेल्या कोविडच्या आठवणी ताज्या असतानाच पाच वर्षांत पुन्हा नवीन विषाणूचे संक्रमण चीनमध्ये पसरले आहे. कोरोना विषाणूप्रमाणेच याची लक्षणे आहेत. या विषाणूचे नाव ‘ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) आहे. हा आरएनए विषाणू आहे. चीनमधील रुग्णालयात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. या विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांना सर्दी व कोविड-१९ सारखी लक्षणे दिसतात. या विषाणूचा सर्वात मोठा परिणाम लहान मुलांवर दिसत आहे. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या विषाणूची लागण झाल्याचे वृत्त आहे.

अशी आहेत लक्षणे

चीनच्या आजार नियंत्रण व प्रतिबंध केंद्रानुसार (सीडीए) या आजारात खोकला, ताप, नाक चोंदणे व गळ्यात खवखव होते. एचएमपीव्हीसोबतच इन्फ्लुएंझा ए, मायकोप्लाज्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. चीनच्या सीडीएने एचएमपीव्ही विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निरीक्षण मोहिमेची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, चीनमध्ये हिवाळ्यात श्वासाशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अज्ञात विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अधिकारी मार्गदर्शक तत्त्वे बनवत आहेत. हिवाळा व वसंत ऋतूच्या दरम्यान श्वसनाशी संबंधित संसर्ग वाढत राहणार आहेत. रायनोविषाणू व एचएमपीव्ही हे दोन्ही विषाणू नवीन आहेत. हे विषाणू १४ वर्षांखालील मुलांवर अधिक परिणाम करत आहेत.

एचएमपीव्ही विषाणूसाठी अजूनही कोणतीही लस नाही. या आजाराचे सामान्य लक्षणे ही सर्दीसारखी असतात. मात्र यामुळे गंभीर संक्रमण होऊ शकते.

भारताला घाबरण्याचे कारण नाही

चीनमधील वाढता संसर्ग लक्षात घेऊन भारताने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे. केंद्रीय आरोग्य खात्यांतर्गत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र हे भारतातील श्वसनाशी संबंधित लक्षणे व एन्फ्लूएंझावर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात आहे. मात्र, भारतात याबाबत घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्र सरकारने सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थितीवर आमची बारीक नजर असून या संबंधातील बातम्यांचा तपास केला जाईल.

आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. अतुल गोयल म्हणाले की, एचएमपीव्ही हा अन्य श्वासाशी संबंधित आजार आहे. यात खोकला व सर्दी होते. फ्ल्यूसारखी लक्षणे दिसून येतात. चीनमधील एचएमपीव्हीबाबतच्या बातम्या येत आहेत. आम्ही भारतातील श्वसनाशी संबंधित माहितीचे विश्लेषण करत आहोत. डिसेंबर २०२४ मध्ये श्वसनविकारांमध्ये वाढ झाल्याचे दिसत नाही.ॉ

एचएमपीव्ही विषाणू काय आहे?

ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे. हा विषाणू न्यूमोवायरिडे कुटुंबाशी संबंधित आहे. २००१ मध्ये डच शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला होता. या विषाणूमुळे श्वसनाशी संबंधित संसर्ग वाढतो. खोकला व शिंकल्यामुळे तो पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर तो वेगाने पसरतो. या विषाणूचा संक्रमण काळ ३ ते ५ दिवस आहे.

मुले व ज्येष्ठांना धोका

या विषाणूचा मोठा धोका मुले व ज्येष्ठांना आहे. हा विषाणू वाढत असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी मास्क घालण्याचा व गर्दीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सतत हात धुण्यास सांगितले आहे.

चीनकडून लपवाछपवी सुरू

चीन सरकार या विषाणूबाबतची खरी आकडेवारी व परिस्थिती उघड करत नसल्याने जगभर चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक