दुबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे अमेरिकी लष्कराला आक्रमक पवित्रा घेण्याचे निर्देश दिले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत सागरी वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि सुरुंग पेरणाऱ्या इराणच्या लहान बोटींना दिसताक्षणी उडवून नष्ट करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत.
मी अमेरिकन नौदलाला आदेश दिले आहेत की, होर्मुझच्या पाण्यात सुरुंग पेरणाऱ्या कोणत्याही इराणी बोटीवर, मग ती कितीही लहान असो, संकोच न करता गोळीबार करून ती नष्ट करावी. याव्यतिरिक्त, आमची ‘माइन स्वीपर्स’ (सुरुंग शोधणारी जहाजे) सध्या सामुद्रधुनी मोकळी करत असून ही मोहीम आता तिप्पट वेगाने राबवली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी कालच होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन मालवाहू जहाजांवर हल्ला करून त्यापैकी दोन जहाजे ताब्यात घेतली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही कारवाई केली आहे. सध्या पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांदरम्यान शांतता चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ताज्या घडामोडींमुळे या चर्चेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
अमेरिकेकडून इराणशी संबंधित आणखी एक तेलवाहू जहाज जप्त
इराणच्या निमलष्करी 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'त दोन जहाजांचा ताबा घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, अमेरिकन सैन्याने इराणच्या तेल तस्करीशी संबंधित आणखी एका टँकरवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.
अमेरिकन संरक्षण विभागाने (पेंटागॉन) 'मॅजेस्टिक एक्स' या तेलवाहू जहाजावर ताबा मिळवला आहे. शिप-ट्रॅकिंग डेटानुसार, हे जहाज श्रीलंका आणि इंडोनेशियाच्या दरम्यान हिंदी महासागरात होते आणि ते चीनमधील 'झौशान'कडे निघाले होते. याच परिसरात अमेरिकेने यापूर्वी 'टिफनी' नावाचे जहाजही जप्त केले होते. जप्त केलेले 'मॅजेस्टिक एक्स' हे गयानाचे ध्वज असलेले जहाज आहे. यापूर्वी त्याचे नाव 'फॉनिक्स' होते.
आज सकारात्मक बातमी
दरम्यान, ट्रम्प यांनी असे विधान केले की, इराणसोबतच्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबतची सकारात्मक बातमी शुक्रवारपर्यंत समोर येऊ शकते. न्यू यॉर्क पोस्टच्या एका वृत्तानुसार, ट्रम्प यांनी एका निवेदनाद्वारे हा संदेश दिला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही असे संकेत दिले आहेत की, इराणसोबतच्या नव्या चर्चा पुढील ३६ ते ७२ तासांत सुरू होऊ शकतात. तथापि, इराणने आपली ही भूमिका कायम ठेवली आहे की, अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींच्या नव्या फेरीत सहभागी व्हायचे की नाही, याबाबतचा निर्णय त्यांनी अद्याप घेतलेला नाही.
भारताचा ‘नरक’ अशा उल्लेखानंतर ट्रम्प यांनी केले रिपोस्ट
भारत आणि चीनचा नरक असा उल्लेख असलेले एक विधान ट्रम्प यांनी सोशल मीडियावर रिपोस्ट केल्याने ट्रम्प पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत. त्यांच्या या रिपोस्टचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. हा सर्व वाद अमेरिकेतील प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांच्या एका पोस्टमुळे सुरू झाला. सॅव्हेज यांनी अमेरिकेतील 'बर्थराईट सिटीझनशिप' कायद्यावर टीका करताना एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की, परदेशी लोक अमेरिकेत केवळ बाळंतपणासाठी येतात जेणेकरून त्यांच्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल. त्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला चीन, भारत किंवा पृथ्वीवरील इतर कोणत्याही नरक असलेल्या ठिकाणी घेऊन जातात. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट आपल्या अधिकृत हँडलवरून रिपोस्ट केली. अशा अपमानजनक विधानाची पोस्ट रिपोस्ट केल्याने, त्यांनी त्याचे समर्थन केले असल्याचा अर्थ काढला जात आहे.
भारताची सावध प्रतिक्रिया
या वादावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांना या वादाबद्दल विचारले असता ते म्हणाले, आम्ही यासंदर्भातील काही बातम्या पाहिल्या आहेत. त्यापलीकडे मला काहीही बोलायचे नाही.
नौदल सचिव जॉन पेलन यांची हकालपट्टी युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाचा निर्णय
ट्रम्प प्रशासनातील नौदल सचिव जॉन पेलन यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस इराणसोबत सुरू झालेल्या युद्धानंतर पेन्टागॉनमधील नेतृत्वात झालेला हा दुसरा मोठा बदल मानला जात आहे. एक्सिओस'ने दिलेल्या वृत्तानुसार, पेलन हे स्वतःला बॉस समजत होते आणि वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करण्याऐवजी स्वतःच्या मर्जीने काम करत होते. संरक्षण सचिव हेगसेथ यांच्याशी त्यांचे पटत नसल्याचे समोर आले आहे. पेलन आणि ट्रम्प यांचे घनिष्ठ संबंध होते. पेलन हे अनेकदा हेगसेथ यांना अंधारात ठेवून रात्री उशिरा थेट राष्ट्राध्यक्षांना युद्धनौका बांधणीबाबत मेसेज करत असत. एका नवीन युद्धनौकेचा प्रस्ताव त्यांनी संरक्षण सचिवांना न सांगता थेट ट्रम्प यांच्याकडे मांडल्याने पेन्टागॉनमधील वरिष्ठ अधिकारी नाराज होते.
‘भारत हा महान देश’ वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टनंतर ट्रम्प यांची सारवासारव
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त ‘रिपोस्ट’मुळे निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी अमेरिकेने गुरुवारी सावध पवित्रा घेतला. भारत हा एक ‘महान’ देश असून त्याचे नेतृत्व माझे ‘चांगले मित्र’ करत आहेत, असा संदेश ट्रम्प यांच्या वतीने देण्यात आला आहे. अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, भारत हा एक महान देश असून तेथील सर्वोच्च स्थानी माझे अत्यंत चांगले मित्र पंतप्रधान मोदी आहेत.
इराणचा युद्धविरामाला नकार
इराणने अमेरिकेसोबतच्या कोणत्याही प्रकारच्या युद्धविरामाला स्पष्टपणे नकार दिला आहे. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत युद्धविराम केवळ तेव्हाच शक्य आहे, जेव्हा (इराणवरील) नाकेबंदी उठवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम २२ एप्रिल रोजी संपुष्टात आला. हा युद्धविराम संपण्यापूर्वी, ट्रम्प यांनी तो एकतर्फीपणे वाढवला होता.