अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मतः मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 'प्रोटेक्टिंग द मीनिंग ॲण्ड व्हॅल्यू ऑफ अमेरिकन सिटिझनशिप' या ट्रम्पच्या कार्यकारी आदेशान्वये जन्मजात नागरिकता कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे अमेरिकेत अवैध किंवा कोणत्याही प्रकारच्या अस्थायी व्हिसावर राहणाऱ्या भारतीय तसेच अन्य देशातील जोडप्यांच्या मुलांना आता जन्माने नागरिकता मिळण्याचा अधिकार समाप्त होणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अस्थायी व्हिसावर राहणाऱ्या लाखो भारतीयांना मोठ्या चिंतेत टाकले आहे. मात्र, अमेरिकेतील फेडरल कोर्टाने ट्रम्प यांच्या या आदेशाला घटनाबाह्य म्हटले आहे. तसेच याच्या अंमलबजावणीसाठी 14 दिवसांची स्थगिती दिली आहे. या आदेशामुळे प्रभावित होणाऱ्या लाखो अस्थायी स्थलांतरित भारतीयांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तरीही त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे.
नवभारत टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार ट्रम्प यांना बदललेला कायदा अमलात आणण्यासाठी न्यायालयात मोठी लढाई लढावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, व्हाईट हाऊसने कायदेशीर लढाई लढण्याची तयारी केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करून राहणाऱ्यांची जन्माला येणारी मूलं तसेच एच 1-बी (H1-B) किंवा अन्य कोणत्याही अस्थायी व्हिसावर अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांच्या मुलांना आता जन्मतः नागरिकता मिळणार नाही. त्यामुळे ग्रीन कार्ड मिळवण्याच्या त्यांच्या आशा धुळीस मिळणार आहे. 20 फेब्रुवारीपासून हा नवीन कायदा लागू होणार होता.
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसणार आहे कारण अमेरिकेत एच 1 बी व्हिसावर राहणाऱ्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त भारतीय आहेत. यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस डिपार्टमेंट - यूएसीआयएसच्या आकडेवारी पाहता अमेरिकेत जन्माने नागरिकत्व घेतलेल्या स्थलांतरितांमध्ये मेक्सिकन लोकांनंतर भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यूएस सेन्सस ब्युरोच्या 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सुमारे 54 लाख भारतीय अमेरिकेत राहतात, जे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 1.47 टक्के आहे. यातील दोन-तृतीयांश लोक पहिल्या पिढीतील स्थलांतरित आहेत, म्हणजेच अमेरिकेत गेलेले ते कुटुंबातील पहिले होते, पण बाकीचे जन्मतः अमेरिकन नागरिक आहेत.
एच1-बी व्हिसाधारक भारतीय यासाठी देखील चिंतेत आहेत कारण त्यांना ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागत आहे. UACIS च्या आकडेवारीनुसार, दहा लाखांहून अधिक एच 1- बी व्हिसाधारक ग्रीन कार्डसाठी रांगेत आहेत. अशा परिस्थितीत ग्रीन कार्ड मिळण्यासाठी किती वेळ लागेल माहीत नाही. त्यातच आता अमेरिकेत जन्म घेणाऱ्या मुलांना जन्मतः मिळणाऱ्या नागरिकत्वाचा अधिकारही राहणार नाही, यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
ट्रम्प यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान
ट्रम्प यांच्या नागरिकत्व कायद्याशी संबंधित या वादग्रस्त आदेशाला 22 राज्यांच्या अॅटॉर्नी जनरल आणि नागरी संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. अमेरिकन संविधानाच्या 14 व्या घटनादुरुस्तीनुसार जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार रोखण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन काँग्रेसला नाही. त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल. न्यू जर्सीचे अॅटॉर्नी जनरल मॅथ्यू प्लॅटकिन म्हणाले की,राष्ट्राध्यक्ष शक्तिशाली आहे, परंतु ते राजा नाही. ते कलमाच्या एका फटक्याने राज्यघटनेचे पुनर्लेखन करू शकत नाहीत.
ट्रम्प यांच्या निर्णयाच्या धसक्याने भारतीय जोडप्यांची सी सेक्शनमध्ये गर्दी
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा धसका घेतलेल्या भारतीय जोडप्यांनी मूदतपूर्व प्रसुतीसाठी रुग्णालयांच्या 'सी सेक्शन'मध्ये (सिझेरियन प्रसुती विभाग) धाव घेतली आहे. न्यू जर्सी येथील प्रसुती रुग्णालयाच्या डॉ. एस. डी. रामा यांनी म्हटले आहे की, त्यांना गेल्या काही तासांपासून अनेक दाम्पत्यांचे फोन येत आहेत ज्यांनी सी-सेक्शनमध्ये (सिझेरियन-सिझर) मूदतपूर्वी प्रसुती करून देण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये 8 आणि 9 महिन्यांच्या गरोदर महिलांची संख्या जास्त आहे. 20 फेब्रुवारीपूर्वी प्रसुतीसाठी त्यांनी सी-सेक्शनसाठी विचारणा केली आहे. तरी काही महिला अशाही आहेत की त्यांना अजून प्रसुतीसाठी जास्त महिन्यांचा कालावाधी आहे. मात्र, त्यांनीही संपर्क साधला आहे.
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 18 हजार भारतीयांना मायदेशी पाठवणार
दरम्यान, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सर्व नागरिकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना परत घेण्यासाठी भारत सरकार ट्रम्प प्रशासनासोबत काम करण्यास तयार असल्याची बातमी समोर आली आहे. यूएस प्रशासनाने अंदाजे 18 हजार बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली आहे ज्यांना मायदेशी परत पाठवले जाईल.भारत सरकार त्यांची ओळख सत्यापित करेल आणि निर्वासन प्रक्रिया सुरू करेल. मात्र, हा आकडा त्यापेक्षा जास्त असू शकतो.