कीईव्ह : गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून रशियाने शनिवारी युक्रेनवर पुन्हा हल्ला केला. रशियाने तब्बल ९ तास क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रविवारी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. रशियाच्या दोन हवाई तळांवर हल्ले करत युक्रेनने रशियाची ४० पेक्षा जास्त विमाने उद्ध्वस्त केली, असा दावा युक्रेनच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे. या हल्ल्यात रशियातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून रशियाच्या ओलेन्या आणि बेलाया या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला केला. लक्ष्य करण्यात आलेली दोन्ही हवाईतळे रशिया-युक्रेन सीमेपासून खूप अंतरावर आहेत. बेलाया हवाईतळ युक्रेनियन सीमेपासून सुमारे ४ हजार किमी अंतरावर आहे आणि ओलेन्या हवाईतळ सुमारे १८०० किमी अंतरावर आहे. युक्रेनने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे बोलले जाते. युक्रेनच्या या हल्ल्यात ४० हून अधिक रशियन बॉम्बर्स उद्धवस्त करण्यात युक्रेनला यश आले आहे. या बॉम्बर्स विमानांचा वापर रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले करण्यासाठी केला जात होता.