वॉशिंग्टन : फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात झालेल्या जोरदार वादविवादानंतर दोन महिन्यांनी अखेर दोन्ही देशांमध्ये दुर्मिळ खनिज करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने युक्रेनला ३५० अब्ज डॉलरची मदत दिली आहे. त्या बदल्यात त्यांनी अमेरिकेने युक्रेनकडे दुर्मिळ खनिजांची मागणी केली होती. आता हा करार पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेला युक्रेनमधून दुर्मिळ खनिजे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युक्रेनमध्ये सुमारे ११ ट्रिलियन डॉलर किमतीची दुर्मिळ खनिजे आहेत. ही रक्कम भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा ३ पट जास्त आहे. युक्रेनमध्ये १०० हून अधिक दुर्मिळ खनिजांचे साठे आहेत. यापैकी २० असे साठे आहेत, जे अमेरिकेच्या आर्थिक वाढ आणि सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.