Diwali 2026 : यंदाच्या दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी घरीच बनवा खास सुगंधी उटणं! पाहा साहित्य अन् कृती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Diwali 2026 : यंदाच्या दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी घरीच बनवा खास सुगंधी उटणं! पाहा साहित्य अन् कृती

या दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी बनवा खास सुगंधी उटणं! डाळी, बदाम, चंदन आणि आंबेहळदीपासून उटणं तयार करण्याची सोपी कृती, साहित्य आणि फायदे जाणून घ्या.

Mayuri Gawade

दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाचा सुगंध, दारात सुंदर रांगोळी आणि दिव्यांची सजावट पाहायला मिळते. या सणात आणखी एक खास परंपरा म्हणजे अभ्यंगस्नान! दिवाळीच्या पहाटे सुगंधी उटणं लावून स्नान करण्याची मजाच काही वेगळी असते. बाजारात अनेक प्रकारची उटणी मिळतात. पण यंदा घरच्या घरीच उटणं तयार केलं तर? स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या डाळी, तांदूळ, बदाम आणि काही नैसर्गिक पदार्थांपासून सुगंधी उटणं बनवता येतं. विशेष म्हणजे, यासाठी महागडे सौंदर्यप्रसाधनं खरेदी करण्याचीही गरज नाही. चला तर मग, अभ्यंगस्नानासाठी खास घरगुती उटणं कसं बनवायचं ते जाणून घेऊया.

उटणं बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागेल?

  • हरभऱ्याची डाळ - अर्धा कप

  • मसूर डाळ - अर्धा कप

  • तांदूळ - अर्धा कप

  • जवस - अर्धा कप

  • बदाम - ४

  • कडुलिंबाची पानं - १० ते १२

  • चंदन पावडर - १ मोठा चमचा

  • आंबेहळद - १ मोठा चमचा

उटणं भिजवण्यासाठी : दूध, साजूक तूप, मध आणि गुलाबपाणी प्रत्येकी १ मोठा चमचा.

घरच्या घरी उटणं कसं बनवायचं?

सर्वप्रथम कढई मंद आचेवर गरम करा. त्यात हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, तांदूळ, जवस, बदाम आणि कडुलिंबाची पानं वेगवेगळी हलकी भाजून घ्या. भाजलेले पदार्थ पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

तयार पावडरमध्ये चंदन आणि आंबेहळद मिसळा. अशा प्रकारे तुमचं घरगुती उटणं तयार होईल. ही पावडर स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा.

अभ्यंगस्नानासाठी उटणं कसं वापरायचं?

आवश्यक तेवढी उटण्याची पावडर एका वाटीत घ्या. त्यात थोडं दूध, तूप, मध आणि गुलाबपाणी मिसळून मऊ पेस्ट बनवा.

ही पेस्ट हातापायांवर आणि शरीरावर हलक्या हाताने लावा. थोड्या वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा. त्वचा जोरात चोळू नका.

घरगुती उटण्याचे फायदे काय?

डाळी आणि तांदळाची बारीक पूड त्वचेवरील साचलेला मळ आणि मृत पेशी हलक्या हाताने दूर करण्यास मदत करू शकते. बदाम, मध आणि तूप यांसारखे घटक त्वचा मऊ ठेवण्यास उपयोगी ठरू शकतात. तर चंदन आणि गुलाबपाण्यामुळे उटण्याला छान सुगंध येतो.

मात्र, नैसर्गिक पदार्थ प्रत्येकाच्या त्वचेला मानवतीलच असं नाही. कडुलिंब, चंदन किंवा इतर घटकांमुळे काहींना खाज किंवा लालसरपणा येऊ शकतो.

उटणं वापरताना ही काळजी घ्या

पहिल्यांदा उटणं वापरणार असाल, तर हाताच्या छोट्या भागावर लावून चाचणी करा. त्वचेवर जखम, पुरळ किंवा जळजळ असल्यास उटणं लावू नका. विशेषतः संवेदनशील त्वचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

यंदाच्या दिवाळीत घरच्या घरी तयार केलेल्या सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नानाची पारंपरिक पद्धत अनुभवता येईल. घरातील साध्या पदार्थांपासून बनणारं हे उटणं सणाच्या तयारीत एक छान भर घालू शकतं.

Maharashtra Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! कोणता पेपर कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

बिश्नोई टोळीला मोठा धक्का! जवळचा साथीदार हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टी, रणवीर सिंहला धमकी दिल्याचा आरोप

सरकारी कर्मचाऱ्यांची सक्तीची निवृत्ती म्हणजे शिक्षा नव्हे - सर्वोच्च न्यायालय

Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव

Thane : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वर्ग करण्याची याचिका फेटाळली