- विशेष
- डॉ. रूपेश पाटकर
नुकताच २२ एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन झाला. यानिमित्ताने आपण कोणतंही उत्पादन करताना ऊर्जेची जी देवाणघेवाण करतो त्यात समतोल असतो का? हा असा समतोल नसेल तर काय होतं? हे समजून घेताना ऊर्जा भ्रष्टतेचा नियम, लॉ ऑफ एन्ट्रॉपी समोर येतो.
माझे बाबा प्रगतिशील शेतकरी होते. मला ही बाब अभिमानास्पद वाटत असे.
पण माझ्या या समजाला पहिला हादरा बसला तो ऑरगॅनिक फार्मिंगवरचं क्लॉड अल्वारीस यांचं पुस्तक चाळताना. त्यात एक विधान असे होते, “अमेरिकेतील एक शेतकरी आज ४० जणांना अन्न आणि कापड पोचवत आहे. तर भात पिकवणारा चिनी शेतकरी काबाडकष्ट करूनही स्वतःचं पोटदेखील भरू शकत नाही. कुशलतेतला हा केवढा मोठा फरक?”
हे विधान कोणालाही मान्य होण्यासारखं होतं. पण धक्का बसला तो पुढच्या वाक्याने. पुढचं वाक्य होतं, “पण बारकाईने आणि तुलनात्मक दृष्टीने बघितलं तर अमेरिकन शेतकऱ्यापेक्षा चिनी शेतकरी बरा.”
मला वाटलं की मी चुकीचं काही वाचलं असावं. मी पुढे वाचू लागलो. त्या परिच्छेदातील शेवटचं वाक्य सगळ्या गोष्टी आकड्यात मांडत होतं. त्यानुसार ‘५० युनिट उत्पादित ऊर्जेसाठी अमेरिकन शेतकरी २५० युनिट ऊर्जा खर्च करतो’. म्हणजे जास्त ऊर्जा खर्च करून कमी ऊर्जा मिळवली जाते आणि ‘चिनी शेतकरी ५० युनिट ऊर्जेच्या उत्पादनासाठी १ युनिट ऊर्जा खर्च करीत असतो.’ याचा सरळ अर्थ हा की पूर्वेचा शेतकरी ५००० टक्के कुशलतेने काम करत आहे आणि अमेरिकन शेतकरी भरपूर सोय असून देखील २० टक्के कुशलतेने काम करत आहे.
पण मला समजेना की, जर असं असेल तर अमेरिकन शेतकरी तोट्यातील शेती करतो असं म्हणावं लागेल. पण कोण शहाणा माणूस तोट्यातील शेती करेल? आणि कोणती व्यवस्था हा मूर्खपणाचा व्यवहार करत राहू देईल?
पण हे आपल्या पुस्तकात मांडणारी व्यक्ती कोणी भाबडी व्यक्ती नव्हे, की शेंड्या लावणारी व्यक्ती नव्हे. तिने आपल्या पुस्तकात ज्या अर्थी हे विधान केलंय त्या अर्थी ते सत्य असलं पाहिजे. हे कोडं सोडवायचं कसं, हा प्रश्न माझ्या मनात बराच काळ रेंगाळत राहिला.
हा प्रश्न मनात असतानाच महाराष्ट्रात ज्यांचा ‘द्राक्ष माऊली’ म्हणून गौरव केला गेला होता, त्या प्रा. श्रीपाद दाभोलकर यांचं ‘प्लेन्टी फॉर ऑल’ (Plenty for All) हे पुस्तक योगायोगाने मला वाचायला मिळालं. त्यात ते विनमय हा एनर्जी इक्विव्हॅलन्टने (energy equivalent) म्हणजे ऊर्जेच्या समतोलाने व्हायला हवा, असं सुचवत होते.
मला ते नवीन होतं. कारण त्या आधी मी विनिमय हा लेबर इक्विव्हॅलन्टने (labour equivalent) म्हणजे श्रमाच्या समतोलाने व्हायला हवा, असं मानत होतो. म्हणजे कोणत्याही व्यवहारात दोन्ही बाजूला समान श्रम असले पाहिजेत, असं मला वाटत होतं.
मुळात कोणत्याही वस्तूची किंमत ही त्यात घातलेल्या श्रमाची किंमत असते. समजा मी तुम्हाला म्हणालो की, तुम्ही नदीतलं हवं तितकं पाणी न्या आणि मला गॅलनमागे दहा रुपये द्या, तर तुम्ही मला द्याल का? अजिबात नाही. तुम्ही उलट मला विचाराल की, नदी काय तुझ्या बापाची आहे का? याच्या उलट तुम्हाला जिथे पाणी हवं आहे, तिथे मी तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे पाणी नेऊन दिलं तर मात्र तुम्ही मला पैसे द्याल. बरोबर ना? काय फरक आहे नदीतील पाणी आणि तुमच्या ठिकाणी आणून दिलेलं पाणी यात? तर तुम्हाला हवं तिथे पाणी आणून देण्यात मी श्रम घेतलेले असतील. म्हणजे मूल्य त्या पाण्याला नाही. त्यात घातलेल्या श्रमाला आहे. म्हणजे किंमत ही श्रमाची असते आणि जेव्हा कोणताही देवाणघेवाणीचा व्यवहार होतो तेव्हा दोन्ही बाजूला समान श्रम असणं आवश्यक असतं.
पण श्रीपाद दाभोलकर देवाणघेवाणीसाठी वेगळाच निकष सांगत होते. ते दोन्ही बाजूला ‘समान ऊर्जा’ असायला हवी असं म्हणत होते. म्हणजे मी कोणत्याही रूपातील एक युनिट ऊर्जा विकत घेत असेन तर मी दुसऱ्या रूपातील एक युनिट ऊर्जा द्यायला हवी, असं त्यांचं म्हणणं होतं.
मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला ते समजलं नाही. मला वाटत होतं की, दोन्ही बाजूला सारखे श्रम असतील तर ऊर्जा पण सारखीच असेल. बराच विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की दगडी कोळशाचा शोध लागेपर्यंत मानवी श्रम आणि बैल, घोडे वगैरेंचे श्रम म्हणजे ऊर्जा होती. पण दगडी कोळशाच्या शोधानंतर ऊर्जा व श्रम यात तेच नातं राहिलं नाही.
कोळशाचा शोध लागेपर्यंत माणूस आणि त्याचे बैल किंवा रेडा यासारखे पाळीव प्राणी यांची ऊर्जा कामात येई आणि ती माणसाला आणि त्याच्या पाळीव प्राण्याला अन्न खाऊन परत मिळवावी लागे. पण दगडी कोळशाचा शोध लागल्यानंतर दगडी कोळसा खाणीतून काढण्यासाठी जेवढी ऊर्जा लागत होती त्यापेक्षा जास्त ऊर्जा तो बाहेर काढल्यावर मिळू लागली. ही ऊर्जा लाखो वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीने साठवून ठेवलेली ऊर्जा होती.
त्यामुळे कोळसा खाणीतून काढण्यासाठी ‘क्ष’ कॅलरी मानवी ऊर्जा वापरल्यावर त्यापेक्षा जास्त म्हणजे ‘क्ष+य’ इतकी ऊर्जा मिळू लागली.
ही जादा मिळणारी ऊर्जा मानवाच्या श्रमांनी तयार झालेली नाही. ती तिजोरीत ठेवल्यासारखी पृथ्वीच्या पोटात पुरलेली होती. जशी तिजोरीत ठेवलेली संपत्ती मर्यादित असते, त्याचप्रमाणे जीवाश्म इंधन (दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल वगैरे) मर्यादित आहे. ते आपल्याला फुकट मिळाल्याने त्याच्या ऊर्जेचा हिशेब आपण विचारात घेत नाही. आपण जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करतो तेव्हा या जीवाश्म इंधनातून जितकी ऊर्जा घेतली तितकीच ऊर्जा धान्याच्या रूपात मिळवली का, याचा विचार करत नाही. पण हिशेब केला तर स्पष्ट होतं की, ५० युनिट ऊर्जेचं धान्य निर्माण करण्यासाठी २५० युनिट ऊर्जा खर्च केली जाते. ही ऊर्जा ट्रॅक्टरमधील डिझेल तसंच खतं व कीटकनाशकं बनवताना खर्च होणारी वीज वगैरेत खर्च झालेली असते.
एखाद्या तरुणाला त्याच्या परसात गुप्तधन सापडावं आणि त्याने ते उधळेपणाने खर्च करावं, तसं काहीसं हे होत आहे.
दाभोलकरांचं पुस्तक वाचताना पुढे मला आणखी एक शब्द मिळाला, तो म्हणजे ‘एन्ट्रॉपी’ (Entropy). हा शब्द यापूर्वी ऐकल्याचं आठवेना. त्यात पुढे म्हटलं होतं की, एन्ट्रॉपीचा नियम म्हणजे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम. पहिला नियम म्हणजे ‘ऊर्जा अक्षयतेचा नियम’. ऊर्जा अक्षयतेचा नियम मला आठवत होता. त्या नियमानुसार विश्वातील एकूण वस्तुमान आणि ऊर्जा कायम असते. ती निर्माण करता येत नाहीत की नष्टही करता येत नाहीत. पण एका प्रकारच्या ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारच्या उर्जेत रूपांतर होतं आणि ऊर्जेचे रूपांतर वस्तुमानात आणि वस्तुमानाचं ऊर्जेत होऊ शकतं.
मी जरा सावकाशपणे ‘लॉ ऑफ एन्ट्रॉपी’ (Law of Entropy) वाचायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आलं की, एन्ट्रॉपी म्हणजे ऊर्जेचं रूपांतर वापरता न येण्यासारख्या रूपात होणं. जसजशी ऊर्जा खराब होत जाते तसतशी एन्ट्रॉपी वाढते. मला शाळेत शिकलेलं आठवलं, की कोणत्याही यंत्रात जेवढी ऊर्जा घातली जाते, त्याच्यापेक्षा कमी ऊर्जा त्यातून निर्माण होते. म्हणजे ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होताना काही ऊर्जा वाया जाते. या वाया जाणाऱ्या ऊर्जेचं मोजमाप म्हणजे एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी म्हणजे काय हे समजून घेताना माझ्या लक्षात आलं, की एन्ट्रॉपीचा नियम म्हणजे ‘ऊर्जा भ्रष्टतेचा नियम’.
म्हणूनच सर्वात कार्यक्षम (efficient) यंत्र किंवा व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यात एन्ट्रॉपी कमीत कमी असेल.
पण दाभोलकर हे का सांगत आहेत? ऑरगॅनिक शेतीचा एन्ट्रॉपीशी संबंध काय? असे प्रश्न माझ्या मनात डोकावले आणि त्यांचं उत्तर मला त्याच्या पुढच्याच परिच्छेदात मिळालं.
आपण शेती करतो म्हणजे नक्की काय करतो? आपल्या जमिनीत धान्य, फळं, कंदमुळं वगैरे उत्पन्न करतो. पण ती उत्पन्न होतात कशी? क्षार आणि पाणी ती जमिनीतून घेतात. पण महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे पिष्टमय पदार्थ किंवा साखर. तसंच प्रथिनं आणि तेलं. हे पदार्थ कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्यापासून सूर्याच्या प्रकाशात बनतात. प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसीस ही ती प्रक्रिया. म्हणजे आपल्या शेतीतील उत्पादनात जी काही ऊर्जा असते, ती सगळी सूर्यप्रकाशातून घेतलेली असते. एक चौरस फुटात पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून हिरवी पानं एका दिवसात तीन ग्राम सुकं वजन तयार करतात. आपल्या जमिनीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून आपण जेवढी सौरऊर्जा गोळा करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा आपण खर्च केली तर तो तोट्याचा धंदा होईल. सध्याची शेती हा तोट्याचा धंदा करत आहे. पण मग ती लोकांना तोट्याची का वाटत नाही? कारण जी जास्तीची ऊर्जा खर्च केली जाते ती जीवाश्म इंधनात साठवलेली ऊर्जा असते. त्यामुळे आपल्या शेतातील एन्ट्रॉपी वाढते आणि जगाची सगळीच अर्थव्यवस्था अशीच चालत असल्यामुळे संपूर्ण जगाची एन्ट्रॉपी वाढत आहे. एन्ट्रॉपी वाढवणं म्हणजे वाया घालवणं, सुसंघटितपणाकडून गोंधळाकडे जाणं.
हे समजून घ्यायला आपण ‘ग्लोबल वॉर्मिंग’चं उदाहरण घेऊ. ग्लोबल वॉर्मिंग का होतं? हवेत कार्बन डाय ऑक्साईड वाढल्यामुळे. तो का वाढतो? तर आपली झाडं जितका कार्बन डाय ऑक्साईड पचवू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित केल्यामुळे.
झाडाची हिरवी पानं ही निसर्गातील अशी गोष्ट आहे, जी एन्ट्रॉपी कमी करते. सूर्याकडून दररोज येणारी ऊर्जा त्याच दिवशी आसमंतात परत जाते. ती पुन्हा येणारी नाही. पण पाने काय करतात? ती ऊर्जा पकडतात आणि आपल्या शरीरात साठवतात. म्हणजेच धान्य, फळं वगैरेंतून आपल्याला मिळणाऱ्या कॅलरीज या मळात सूर्याकडून आलेल्या असतात. लाकडात साठलेली आग ही सूर्याकडून आलेली असते. वनस्पतींनी सूर्याची साठवलेली ऊर्जा गाय, हरीण यासारख्या शाकाहारी प्राण्यांना मिळते. त्यांच्यापासून वाघ, सिंह यासारख्या मांसाहारी प्राण्यांना मिळते.
निसर्गाच्या एन्ट्रॉपी कमी करण्याच्या यंत्रणेचा उपयोग करून घेण्याऐवजी माणूस अधिक एन्ट्रॉपी निर्माण करत आहे.
दाभोलकर यांचा निष्कर्ष आहे की, माणसाने एन्ट्रॉपी कमी करण्याच्या निसर्गाच्या यंत्रणेचा अभ्यास केला आणि त्याचे सूत्र बनवून शेती केली तर तो केवळ दहा गुंठ्यात पाच माणसांना समृद्ध जीवन जगता येईल, इतकं उत्पन्न मिळवू शकतो. (श्रीपाद दाभोलकर यांची ‘केल्याने होत आहे रे’ आणि ‘विपुलाच सृष्टी’ ही दोन मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत.) माझ्या वडिलांना हे माहीत नव्हतं. त्यामुळे ते जरी प्रामाणिकपणे शेती करत असले तरी जगात एन्ट्रॉपी वाढायला हातभार लावत होते.
मनोचिकित्सक व लेखक