आपण जेव्हा फळं खरेदी करतो, तेव्हा त्यावर लावलेले छोटे स्टिकर बहुतांश वेळा दुर्लक्षित करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, की या लहानशा स्टिकरवर लिहिलेला कोड तुम्ही खरेदी केलेल्या फळाचा संपूर्ण शेती इतिहास सांगतो? हा कोड समजून घेतल्यास तुम्ही आरोग्यासाठी अधिक योग्य फळांची निवड करू शकता.
कोड काय सांगतो?
४ अंकी कोड (उदा. 4011) :
ज्या फळांवर चार अंकी कोड असतो त्या प्रकारची फळे ही रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करून पिकवलेली असतात. या प्रकारची फळे जरी 'नैसर्गिक' वाटत असली तरी, ही फळे रसायनयुक्त असतात. जी आरोग्यास हानिकारकही ठरू शकतात.
५ अंकी कोड – '८' ने सुरू होणारा (उदा. 84011):
जर फळांवर पाच अंकी कोड असेल आणि तो '८' ने सुरू होत असेल (उदा. 84011), तर हे फळ अनुवांशिकदृष्ट्या मॉडिफाइड (GMO) आहे. म्हणजेच, त्याच्या बियांमध्ये कृत्रिम पद्धतीने काही बदल करण्यात आलेले असतात. हे बदल ते फळ पटकन वाढण्यासाठी, जास्त टिकाऊ तसेच उत्पादनक्षम बनण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी केले जातात. या फळांचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.
५ अंकी कोड – '९' ने सुरू होणारा (उदा. 94011):
हा कोड सांगतो, की फळ १००% सेंद्रिय (Organic) आहे. यात कोणतेही रासायनिक खत, कीटकनाशक किंवा GMO घटक वापरले जात नाहीत. अशी फळं आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आणि पोषक मानली जातात.
स्थानिक शेतकऱ्यांकडून फळं खरेदी करणे हा नेहमीच चांगला पर्याय असतो. यामुळे तुम्हाला ताजी, नुकतीच तोडलेली फळे मिळतात आणि मधल्या दलालांशिवाय शेतकऱ्यालाही थेट पैसे मिळतात. यामुळे त्यांना थेट आर्थिक फायदा होतो.
निवड तुमच्या हातात...
पुढच्या वेळी तुम्ही बाजारात फळं विकत घेताना त्यावरील स्टिकर आणि कोड नक्की वाचा. कारण ही छोटीशी माहिती तुमच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम करू शकते.