गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी करा आलू मटारची भाजी; मोजक्या साहित्यात बनवा झटपट रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी करा आलू मटारची भाजी; मोजक्या साहित्यात बनवा झटपट रेसिपी

गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी आलू मटारची चवदार भाजी बनवा. मोजक्या साहित्यात हॉटेलस्टाइल चव कशी मिळवायची, जाणून घ्या सोपी रेसिपी.

Mayuri Gawade

गौरी-गणपतीच्या दिवसांत नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तयारीही सुरू असते. अशावेळी भाजीसाठी नेहमीपेक्षा थोडा वेगळा पर्याय हवा असेल तर आलू मटारची मसालेदार भाजी नक्की करून पाहा. बटाटे आणि हिरवे मटार यांच्या जोडीला कांदा-टोमॅटोची ग्रेव्ही, ताजा मसाला आणि थोडासा गोडवा यामुळे भाजीला छान हॉटेलस्टाइल चव येते. विशेष म्हणजे ही भाजी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात तयार करता येते.

साहित्य

  • बटाटे - ३ ते ४

  • हिरवे मटार - ३ कप

  • कांदा - १ ते २, बारीक चिरलेला

  • टोमॅटो - २

  • आले-लसूण पेस्ट - १ ते २ चमचे

  • हिरवी मिरची - चवीनुसार

  • तेल - २ ते ३ टेबलस्पून

  • जिरे - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • लाल तिखट - १ ते २ टीस्पून

  • धनेपूड - १ ते २ टीस्पून

  • कसुरी मेथी - थोडी

  • दूध - सुमारे १ कप

  • साखर - थोडी

  • मीठ - चवीनुसार

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

ताज्या गरम मसाल्यासाठी: धणे, जिरे, २ सुकी लाल मिरची, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी.

आलू मटारची भाजी कशी कराल?

१. बटाटे आधी परतून घ्या
सुरुवातीला बटाटे सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. कढईत तेल गरम करून बटाटे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आणि ते बाजूला काढा.

२. कांदा-टोमॅटोची पेस्ट तयार करा
त्याच कढईत कांदा, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतवा. मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर आणि दूध घालून मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट करून घ्या.

३. मसाल्याची फोडणी द्या
कढईत थोडं तेल घेऊन जिरे घाला. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि धनेपूड घाला. लगेच मटार आणि परतलेले बटाटे टाकून दोन मिनिटं चांगले परतून घ्या.

४. ग्रेव्ही घालून भाजी शिजवा
तयार केलेली कांदा-टोमॅटोची पेस्ट कढईत घाला आणि सर्व साहित्य एकजीव करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवावं आणि मंद आचेवर बटाटे व मटार मऊ होईपर्यंत शिजू द्यावं.

५. शेवटी ताजा मसाला आणि कोथिंबीर
भाजी शिजल्यावर मीठ, थोडी साखर, कसुरी मेथी आणि ताजा भाजलेला गरम मसाला घाला. दोन-तीन मिनिटं मंद आचेवर शिजवल्यानंतर वरून कोथिंबीर घाला.

गरमागरम आलू मटारची भाजी पुरी, पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत वाढता येते. गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी किंवा पाहुण्यांच्या जेवणासाठी हा चवदार पर्याय नक्की करून पाहा.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले