अंड्याला पोषणासाठी एक सुपरफूड मानलं जातं. यात प्रथिने, जीवनसत्त्वं आणि खनिजांचे भरपूर प्रमाण असतं, त्यामुळे शरीराला ताकद, ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती मिळते. अनेक लोक अंडं नियमितपणे खातात, पण त्याबद्दल काही गैरसमज आजही आहेत. विशेषतः पिवळ्या भागाबाबत, कारण अनेकांना वाटतं की अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. मात्र, यात खरंच काही तथ्य आहे का? याचबाबत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
अंड्यातील पोषणमूल्य
डॉ. वत्स सांगतात, "एका अंड्यामध्ये सुमारे ६ ग्रॅम प्रथिने असतात. त्यापैकी जवळजवळ ४० टक्के प्रथिने अंड्याच्या पिवळ्या भागातून मिळतात." फक्त एवढंच नाही, तर पिवळ्या भागात ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन डी, कोलीन, झिंक, फॉस्फरस, आयर्न आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात. हे घटक मेंदू, लिव्हर, स्नायू, हाडं आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
अंड्याचा पिवळा भाग हा आपल्या शरीरासाठी "सुपरफूड"सारखा कार्य करतो. त्यातील पोषक घटक प्रतिकारशक्ती वाढवतात, स्मरणशक्ती सुधारतात आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
पिवळ्या भागाचे फायदे सविस्तर जाणून घ्या
डॉ. वत्स सांगतात की पिवळ्या भागात असलेला कोलीन हा घटक मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा घटक मेंदूतील पेशींमधील संवाद सुधारतो आणि स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवतो.
तसंच त्यात असलेले ल्यूटिन आणि झीएक्सँथिन हे डोळ्यांसाठी नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहेत. आजकाल वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर होणारा ताण आणि थकवा यापासून हे घटक संरक्षण करतात.
सर्वात खास म्हणजे पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळतं. हे जीवनसत्त्व दुधात सहजपणे मिळत नाही, पण अंड्यात ते नैसर्गिकरीत्या असतं. व्हिटॅमिन डी हाडं मजबूत ठेवतं आणि शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतं.
पांढऱ्या भागाचे फायदे
अंड्याचा पांढरा भाग हा लीन प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.
तो कमी कॅलरी आणि जवळजवळ फॅट-फ्री असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो.
यात व्हिटॅमिन बी२ आणि बी३ सारखी काही जीवनसत्त्वं असतात, जी त्वचेसाठी आणि ऊर्जेसाठी महत्त्वाची आहेत.
मात्र पांढऱ्या भागात सूक्ष्म पोषक घटक फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळे फक्त पांढरा भाग खाल्ल्यास शरीराला संपूर्ण पोषण मिळत नाही.
मग कोणता भाग खावा?
डॉ. वत्स यांच्या मते, "जर तुम्हाला फक्त प्रथिनांची गरज असेल, तर पांढरा भाग पुरेसा आहे. पण जर शरीराला संपूर्ण पोषण, जीवनसत्त्वं आणि खनिजे हवी असतील, तर संपूर्ण अंडं खाणं सर्वात योग्य आहे."
दररोज किती अंडी खावीत?
अनेकांना हा प्रश्न पडतो की दररोज किती अंडी खावीत. यावर डॉ. वत्स स्पष्ट सांगतात, “निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज १ ते २ अंडी खाणं पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत नाही.” फक्त, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल, लिव्हर किंवा इतर आरोग्याशी संबंधित काही तक्रारी असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.