नेहमीच्या कारल्याला द्या नवा ट्विस्ट; कमी तेलात बनवा हेल्दी टिक्की, मुलंही आवडीने खातील 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

नेहमीच्या कारल्याला द्या नवा ट्विस्ट; कमी तेलात बनवा हेल्दी टिक्की, मुलंही आवडीने खातील

कारले, पनीर, बेसन आणि मसाल्यांच्या संगमातून तयार होणारी ही टिक्की वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठीही चांगला पर्याय ठरू शकते.

किशोरी घायवट-उबाळे

नेहमीची कारल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी कारल्यापासून काहीतरी हटके बनवून पाहा. कमी तेलात तयार होणारी हेल्दी कारले टिक्की चवीला खमंग, पौष्टिक आणि पोटभर करणारी आहे. कारले, पनीर, बेसन आणि मसाल्यांच्या संगमातून तयार होणारी ही टिक्की वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठीही चांगला पर्याय ठरू शकते. हिरव्या चटणीसोबत तिचा आस्वाद आणखीच वाढतो.

साहित्य :

  • २ मोठी कारली

  • १/२ कप लो-फॅट किसलेले पनीर

  • १ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • १ इंच आलं (बारीक चिरलेलं)

  • ४ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)

  • १/२ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली)

  • १ कप बेसन

  • १ टीस्पून आमचूर पावडर किंवा चाट मसाला

  • १ टीस्पून लाल तिखट

  • १/२ टीस्पून हळद

  • १/२ टीस्पून ओवा

  • चवीनुसार मीठ

  • टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी थोडे तेल

कृती :

१. कारली स्वच्छ धुवून त्यावरील साल किसून घ्या. हे किसलेले कारले मिक्सरमध्ये हलकेसे फिरवून जाडसर मिश्रण तयार करा.

२. या मिश्रणात १ टीस्पून मीठ घालून सुमारे ३० मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते.

३. त्यानंतर कारल्यातील अतिरिक्त पाणी चांगले पिळून काढा.

४. एका मोठ्या भांड्यात कारले, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि किसलेले पनीर एकत्र करा.

५. त्यात आमचूर पावडर, लाल तिखट, हळद, ओवा, बेसन आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.

६. तयार मिश्रणाचे लहान गोळे करून हाताने हलके दाबत टिक्कीचा आकार द्या.

७. नॉन-स्टिक तव्यावर थोडे तेल लावून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

८. गरमागरम कारले टिक्की चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • कारल्याला मीठ लावून ३० मिनिटे ठेवल्याने त्याचा कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

  • कारल्यातील पाणी पूर्णपणे पिळून काढल्यास टिक्की कुरकुरीत बनते.

  • मिश्रण पातळ वाटत असल्यास थोडे अतिरिक्त बेसन घाला.

  • टिक्की कमी तेलात शॅलो फ्राय करा. त्यामुळे ती अधिक हेल्दी राहते.

  • चवदार बनवण्यासाठी चाट मसाला किंवा आमचूर पावडर शेवटीही हलकी भुरभुरू शकता.

आजचे राशिभविष्य, ११ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रोज मूठभर भोपळ्याच्या बिया खा; हृदयापासून पचनापर्यंत होतील महत्त्वाचे फायदे

Ganesh Chaturthi 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ट्राय करा 'हे' स्पेशल मोदक; जाणून घ्या रेसिपी

रुपाली भोसलेचा मराठमोळा अंदाज; 'साज शृंगार' म्हणत शेअर केले खास फोटो

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल