रोज नाश्त्यात तेच पोहे, उपमा किंवा शिरा खाऊन मुलं कंटाळतातआणि आईंसाठी सकाळी त्यांना काहीतरी चविष्ट, हलकं आणि पौष्टिक देणं हीच खरी कसरत! अशा वेळी ताज्या भाज्यांचं फिलिंग आणि कमी तेलात शेकलेले घरचे स्प्रिंग रोल्स हा एकदम हटके आणि हेल्दी पर्याय ठरतो. चव, पोषण आणि कुरकुरीत मजा यामुळे मुलांचा दिवस आनंदात सुरू होण्यासाठी हे रोल्स परफेक्ट ठरतात.
तेल
आलं–लसूण (बारीक चिरलेले)
मैदा (पेस्टसाठी)
गाजर
कोबी
शिमला मिरची
हिरवी मिरची
सोया सॉस
चिली सॉस
व्हिनेगर
शेजवान चटणी
स्प्रिंग रोल शीट्स
कांदा
मीठ
चिली फ्लेक्स
सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या किंवा हवे असल्यास मिक्सरमध्ये जाडसर वाटून ठेवा. कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेलं आलं आणि लसूण परतून घ्या. नंतर कांदा घालून हलका लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर गाजर, कोबी, शिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून भाज्या हलक्या शिजेपर्यंत परता, पण त्यांची कुरकुरीतपणा टिकू द्या.
आता या मिश्रणात सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि चिली फ्लेक्स घालून सर्व छान एकत्र करा. शेवटी शेजवान चटणी मिसळून गॅस बंद करा आणि फिलिंग थंड होऊ द्या. स्प्रिंग रोल शीटवर हे थंड झालेले मिश्रण भरून रोल घट्ट गुंडाळा आणि मैद्याच्या पेस्टने नीट सील करा. तयार रोल्स गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तयार झाले झटपट, घरचे कुरकुरीत स्प्रिंग रोल्स! शेजवान चटणी किंवा चिली सॉससोबत सर्व्ह केल्यास चव अधिक खुलते.