Hepatitis B & C Disease Freepik
लाईफस्टाईल

Hepatitis B & C: वाढतोय 'हेपेटाइटिस बी आणि सी' हा आजार, कसा होतो संसर्ग? जाणून घ्या

Tejashree Gaikwad

How does the infection occur: हेपेटाइटिस बी आणि सी हे विषाणू यकृतामध्ये संसर्ग निर्माण करतात. या संसर्गामुळे यकृतातील पेशींचे (हिपॅटोसायट्स) नुकसान होते, पेशींवर डाग येतात व परिणामी, पेशींचे खूप नुकसान होते. हळूहळू या प्राथमिक नुकसानाची परिणती सिरॉसिसमध्ये होते, काही केसेसमध्ये यकृतामध्ये ट्युमर तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे यकृताचे कॅन्सर उद्भवतात. हे सर्व नुकसान लवकरात लवकर लक्षात येऊन त्यावर तातडीने उपचार न केले गेल्यास शरीर रोगग्रस्त होत जाते आणि रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात मेट्रोपोलिस हेल्थकेयर लिमिटेड (राजरहाट)चे कन्सल्टन्ट मायक्रोबायोलॉजिस्ट, डॉ सयोनी दत्ता यांच्याकडून...

हेपेटाइटिस बी आणि सी संसर्ग झाल्यापासून रुग्णाला जीव गमवावा लागेपर्यंतचा कालावधी बराच मोठा असतो. त्यामुळे हेपेटाइटिस बी आणि सी संसर्ग झाल्याचे जितके लवकर लक्षात येईल, तितके शरीर रोगग्रस्त होण्याची आणि रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते. या आजाराबाबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रत्येक वेळी त्याची ठळक लक्षणे दिसून येतीलच असे नाही, उदाहरणार्थ, सुरुवातीच्या टप्प्यात कावीळ. हा विषाणू रक्तामध्ये राहतो आणि यकृतातील पेशींचे नुकसान करत राहतो पण ते कोणत्याही क्लिनिकल तपासणीमध्ये दिसून येत नाही. अशावेळी जर रक्तामध्ये विषाणू आहे अथवा नाही याची तपासणी केली तर मात्र व्हायरल कम्पोनंट्स किंवा अँटीबॉडी दिसून येऊ शकतात. हेपेटाइटिस बी आणि सी संसर्ग खूप आधीच लक्षात शक्य आहे आणि त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. अशा काही विशिष्ट गोष्टी असतात ज्यामधून संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्या गोष्टी ज्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत किंवा घडत असतात अशा व्यक्तींची आधीच तपासणी करणे आवश्यक असते जेणेकरून संसर्ग खूप जास्त वाढणे टाळता येते.

हेपेटाइटिस बी आणि सी संसर्ग झालेले रक्त किंवा शरीरातील इतर द्रवांमधून, गरोदर असताना किंवा प्रसूतीच्या वेळी मातेकडून बाळाला किंवा असुरक्षित संभोग करताना किंवा इंजेक्शनसाठी एकच सिरिंज अनेक व्यक्तींसाठी वापरली जात असल्यास किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्ताशी संपर्कात आलेल्या गोष्टी जसे की, रेझर वापरल्यास किंवा एकच टॅटू सुई किंवा नेल क्लिपर्स वापरल्यास पसरू शकतात. रक्त किंवा रक्त उत्पादने ज्यांना वारंवार द्यावी लागतात अशा व्यक्तींना (हेपेटाइटिस बी आणि सी संसर्गाचे प्रमाण खूप जास्त अशा देशांमध्ये), हेमोडायलिसिस रुग्णांना, रुग्णाचे खूप जवळचे नातेवाईक, हेपेटाइटिस संसर्ग झालेल्या (एचबीएसएजी-पॉझिटिव्ह) मातांची नवजात बालके, आयव्ही ड्रग्सचा गैरवापर करणारे, सेक्स वर्कर्स, कैदी यांना हेपेटाइटिस बी आणि सी संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा व्यक्तींमध्ये हेपेटाइटिस बी आणि सी खूप आधी लक्षात आल्यास आपण संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण तसेच व्यक्ती रोगग्रस्त होण्याचे, दगावण्याचे प्रमाण खूप कमी करू शकतो. हे संसर्ग लक्षात येणे सोपे आहे. जलद, कमी खर्चाच्या, सोप्या आणि विश्वसनीय तपासण्या करून हेपेटाइटिस बी आणि सी संसर्ग खूप जास्त गंभीर रूप धारण करण्याच्या आधीच लक्षात येऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तींना हा संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त आहे अशांची तपासणी केली गेली पाहिजे. ज्या व्यक्तींना आधी कधीही संसर्ग झालेला नाही किंवा ज्यांनी हेपेटाइटिस बी चे लसीकरण पूर्ण केलेले नाही, गरोदर असलेल्या सर्व महिला, खासकरून पहिल्या तीन महिन्यांमध्ये, लसीकरण केलेले असो किंवा नसो, आधी तपासणी केलेली असो वा नसो, त्यांची तपासणी केली गेली पाहिजे.

भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकामध्ये हेपेटाइटिस बी लसीचा समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये येऊन प्रसूती करण्याला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे जेणेकरून प्रत्येक नवजात बाळाला जन्माच्या वेळी हेपेटाइटिस बी चा जन्म-डोस देऊन संसर्ग झालेल्या मातांकडून बाळांमध्ये संसर्ग पसरण्याला आळा घालता येईल. बऱ्याच वेळा लोकांना हेपेटाइटिस बी आणि सी संसर्गाचे गांभीर्य, त्याचे परिणाम आणि लवकरात लवकर आजार लक्षात येण्यासाठी करावयाच्या तपासण्या यांची माहिती नसते. तपासण्यांचा प्रभावी वापर, सामाजिक जागृती आणि आरोग्य देखभाल सुविधांच्या सर्व स्तरांमध्ये तपासण्यांची उपलब्धता अत्यावश्यक आहे. या तपासण्या सर्व स्तरांमध्ये, शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये, सरकारी तसेच खाजगी संस्थांमध्ये उपलब्ध असल्या पाहिजेत. हेपेटाइटिस सी ची अँटीबॉडी आणि हेपेटाइटिस बी चे सरफेस अँटीजेन तपासणीमध्ये दिसून आल्यास, विविध मॉलिक्युलर एसे करून त्याची खात्री करून घेता येते. आजार लवकरात लवकर लक्षात आल्यास उपचार सुरु करण्यात मदत होते, उपचारांमुळे आजार पुढे वाढण्यास प्रतिबंध घातला जाऊ शकतो आणि रुग्णाला त्रास होत नाही. अनेक नवीन औषधे आली आहेत, त्यामुळे हेपेटाइटिस बी आणि सी वर विश्वसनीय आणि प्रभावी उपचार करणे आता शक्य आहे.

संदर्भ: सीडीसी, नॅशनल व्हायरल हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम, भारत सरकार

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला