आपल्या दिवसातील मोठा वेळ आपण आपल्या कामाच्या ठिकाणी घालवतो. इथे आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांसोबत जुळवून घ्यावे लागते. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्यांचा आदर ठेवावा लागतो. मात्र, बऱ्याच वेळा, असे काही प्रसंग घडतात की आपल्या रागावरील आपले नियंत्रण सुटते. याचा परिणाम आपल्या कामावर होतो तसेच सहकाऱ्यांशी असलेले संबंध देखील बिघडू शकतात. त्यामुळेच कामाच्या ठिकाणी आपल्या रागाचे व्यवस्थापन करायला शिकणे महत्त्वाचे असते. रागावर नियंत्रण मिळवता आले तर कामाच्या ठिकाणी आपला दिवस आनंदाचा जातो. रागावर नियंत्रण कसे मिळवावे यासाठी काही टिप्स...
लगेच प्रतिक्रिया देऊ नका; किमान १० सेकंद थांबा
कोणत्याही गोष्टीचा राग आला की लगेच प्रतिक्रिया देण्याची आपली सवय असते, पण हीच सवय सर्वात जास्त नुकसान करते. राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका त्या ऐवजी किमान १० सेकंद थांबा. एक दीर्घ श्वास घ्या आणि एक ते दहा पर्यंत मोजा. त्यानंतर काय प्रतिक्रिया द्यायची ठरवा. लक्षात घ्या, हे १० सेकंद खूप महत्त्वाचे असतात. यामुळे रागावर त्वरित नियंत्रण मिळवता येते.
प्रतिसाद देऊ नका; शांत राहा
तुम्हाला कोणी सातत्याने डिवचत असेल तर अशा वेळी वाद न घालता तुम्ही शांत राहा. हाच राग व्यक्त करण्याचा सर्वोत्तम पर्याय असतो. यामुळे तुमची प्रतिमा भांडखोर म्हणून नाही तर एक संयमी व्यक्ती म्हणून होऊ शकते. त्याचा फायदा तुम्हाला बढती मिळण्यासाठी होऊ शकतो.
बाहेर निघून जा
जेव्हा तुम्हाला खूप राग आला असेल तेव्हा काही काळासाठी तिथून दूर जाणे चांगले. पाणी प्या, बाहेर थोडे फिरायला जा किंवा दुसऱ्या कशाने तरी स्वतःचे लक्ष विचलित करा. हा "विराम" तुम्हाला केवळ शांत करणार नाही, तर परिस्थितीकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देखील देईल.
विनोदी राहा
एखाद्या गंभीर परिस्थितीत विनोद करणे हे चांगले असते. यामुळे तणाव निवळतो. वातावरण हलकेफुलके आनंदी होते. मात्र, विनोद हा कधीही व्यंगात्मक नसावा किंवा कोणाच्या भावना यामुळे दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.
आहार-व्यायाम आणि झोप
राग हा केवळ बाह्य कारणांमुळे येत नाही, तर झोपेचा अभाव, खराब आहार आणि ताण यामुळे देखील येतो. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली, निरोगी अन्न खाल्ले आणि थोडा व्यायाम केला तर तुमची रागावरची पकड अधिक मजबूत होईल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)