Fodanicha Bhaat Recipe: अनेक वेळा जेवणासाठी बनवलेला भात उरतो. आपण अन्न फेकून देत नाही म्ह अशावेळी त्यापासून काय बनवता येईल याचा विचार केला जातो. तुम्ही अशाप्रकारे उरलेल्या भातापासून एक-दोन नव्हे तर अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकता. पण एवढया सगळ्या रेसिपीमधून सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे फोडणीचा भात. ही महाराष्ट्रातील घरातील सगळ्यात प्रसिद्ध रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही एकदम कमी वेळेत तयार करू शकता. फोडणी म्हणजेच तडका यावरूनच या रेसिपीला नाव पडले आहे. यासाठी साहित्यही फार कमी लागते.
मोहरी आणि कढीपत्ता मसाला घालून बनवलेल्या या रेसिपीसाठी इतर कोणत्याही साइड डिशची गरज नाही. रात्रीच्या जेवणात काही हलके खावेसे वाटत असेल तर त्यासाठी ही डिश उत्तम आहे. चला ही डिश कशी बनवायची हे जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
उरलेला भात
एक ते दोन चमचे तिखट
एक चमचा हळद
चवीनुसार मीठ
दोन चमचे तेल किंवा तूप
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा मोहरी
दोन ते तीन लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१० ते १२ कढीपत्ता
चिमूटभर हिंग
एक बारीक चिरलेला कांदा
मूठभर चिरलेली कोथिंबीर
जाणून घेऊयात कृती
सगळ्यात आधी उरलेल्या भातामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्या.
याच दरम्यान एका कढईत एक ते दोन चमचे तूप घालून गरम होऊ द्या.
नंतर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाका.
त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
हे मिश्रण छान परतून घेतल्यावर नंतर त्यात भात घाला.
भात मसाल्यात चांगले मिसळा.
सतत परतत राहा आणि दोन ते तीन मिनिटे शिजवा.
वरून चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा आणि फोडणीचा भात सर्व्ह करा.