कपड्यांना व्यवस्थित इस्त्री केल्यामुळे आपला लूक अधिक नीटनेटका दिसतो. काही जण तर स्वतःच्या कपड्यांना स्वतःच इस्त्री करणं पसंत करतात. इस्त्री करण्याची प्रक्रिया काही लोकांसाठी तणाव कमी करणारी आणि मनाला शांतता देणारी ठरते. कपड्यांवरील सुरकुत्या घालवताना एकाग्रता वाढते, काम पूर्ण केल्याचं समाधान मिळतं आणि आत्मविश्वासही वाढतो, असं मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं. मात्र, अनेकांना इस्त्री करणं हे रोजचं कंटाळवाणं काम वाटतं. शिवाय, चुकीच्या पद्धतीने इस्त्री केल्यास कपड्यांचा रंग खराब होऊ शकतो किंवा त्यावर डाग पडू शकतात. त्यामुळेच कपड्यांना इस्त्री करताना काही सोप्या ट्रिक्स वापरल्यास हे काम कमी वेळात आणि सहज करता येऊ शकतं. जाणून घेऊया अशाच ५ खास टिप्स...
१. आधी कपड्यांच्या उलट्या बाजूने इस्त्री करा
कपड्यांना थेट समोरच्या बाजूने इस्त्री करण्याऐवजी आधी उलट्या बाजूने इस्त्री करा. विशेषतः गडद रंगाच्या कपड्यांसाठी ही ट्रिक फायदेशीर ठरते. यामुळे कपड्यांचा रंग फिका पडण्याची शक्यता कमी होते. तसेच इस्त्रीमुळे कपड्यांवर येणारे चमकदार डागही टाळता येतात. उलट्या बाजूने इस्त्री केल्यानंतर कपडे सरळ करा आणि कमी तापमानावर समोरच्या बाजूने हलक्या हाताने इस्त्री करा.
२. कपड्यांवर थेट पाणी शिंपडू नका
कपड्यांवरील सुरकुत्या घालवण्यासाठी अनेकजण थेट पाणी शिंपडतात. मात्र, त्याऐवजी कपड्यांवर एक पातळ ओलसर कापड ठेवा आणि त्यावरून इस्त्री फिरवा. यामुळे सुरकुत्या सहज निघण्यास मदत होते. इस्त्री करताना जास्त दाब देण्याचीही गरज पडत नाही. शिवाय कपड्यांवर इस्त्रीचे डाग पडण्याचा धोका कमी होतो.
३. शर्टची बटणं लावून इस्त्री करू नका
शर्टला इस्त्री करताना सर्व बटणं लावून इस्त्री करणं टाळा. असं केल्यामुळे बटणांवर इस्त्रीचा दाब पडू शकतो आणि कपड्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शर्टचं फक्त वरचं बटण लावा आणि कॉलरपासून खालील बाजूने इस्त्री करण्यास सुरुवात करा. यामुळे शर्टला व्यवस्थित इस्त्री होते आणि कॉलर, बाही यांचं नुकसान होण्यापासूनही बचाव होतो.
४. चुरघळलेल्या कपड्यांसाठी फ्रीजरचा वापर करा
कपड्यांवरील चुरघळलेल्या रेषा घालवण्यासाठी फ्रीजरची मदत घेता येते. यासाठी कपड्यांवर हलकं पाणी शिंपडा आणि त्याची घट्ट गुंडाळी करा. ही गुंडाळी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी कपडे बाहेर काढून साधारण २० मिनिटं सामान्य तापमानाला ठेवा. त्यानंतर कमी स्टीमवर हलक्या हाताने इस्त्री करा. मात्र, ही पद्धत वापरण्यापूर्वी कपड्याच्या फॅब्रिकची काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः रेशमी कपड्यांसाठी आधी काळजी सूचना तपासा.
५. इस्त्री करताना वापरा सुगंधी तेल
इस्त्री केलेल्या कपड्यांना छान सुगंध यावा असं वाटत असेल तर सुगंधी तेलाचा वापर करता येऊ शकतो. इस्त्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या ओलसर कापडावर सुगंधी तेलाचे काही थेंब टाकल्यास कपड्यांना मंद सुगंध येऊ शकतो. मात्र, तेल थेट कपड्यांवर किंवा इस्त्रीच्या पाण्याच्या टाकीत टाकू नका. त्यामुळे कपड्यांवर डाग पडू शकतात किंवा इस्त्रीचं नुकसान होऊ शकतं.
या छोट्या-छोट्या ट्रिक्स वापरून कपड्यांना इस्त्री करणं अधिक सोपं होऊ शकतं. शिवाय कपड्यांचा रंग आणि पोत टिकवून ठेवण्यासही मदत होईल.