कास पठारावर फुलांची पर्वणी! मुंबई-पुण्याहून कसं जायचं? तिकीट किती? जाण्यापूर्वी 'ही' माहिती नक्की वाचा 
लाईफस्टाईल

कास पठारावर फुलांची पर्वणी! मुंबई-पुण्याहून कसं जायचं? तिकीट किती? जाण्याआधी 'हे' नक्की वाचा

Kaas Plateau Flower Season 2026: साताऱ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेलं कास पठार सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे.

किशोरी घायवट-उबाळे

Kaas Plateau Tourism : महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर कास पठार तुमच्या यादीत नक्कीच असायला हवं. महाराष्ट्राचं 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हणून ओळखलं जाणारं आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा भाग असलेलं कास पुष्प पठार १ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. यंदाच्या पर्यटन हंगामासाठी कास पठार कार्यकारी समिती आणि वनविभागाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

साताऱ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेलं कास पठार सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. पावसाळ्यानंतर येथे विविध प्रकारची हंगामी रानफुलं बहरू लागतात. त्यामुळे काही दिवसांतच संपूर्ण पठार विविध रंगांच्या फुलांनी सजलेलं पाहायला मिळतं.

सप्टेंबरमध्ये पाहायला मिळतो फुलांचा बहर

कास पठारावर शेकडो हंगामी आणि स्थानिक फुलांच्या प्रजाती आढळतात. पाऊस आणि हवामानानुसार वेगवेगळ्या फुलांचा बहर वेगवेगळ्या काळात येतो. साधारणपणे ऑगस्टच्या अखेरीपासून ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत कासवर फुलांचा हंगाम पाहायला मिळतो. त्यातही सप्टेंबर महिन्यात पठारावर सर्वाधिक रंगीबेरंगी फुलांचा नजारा पाहायला मिळण्याची शक्यता असते.

यंदा सध्या कास पठारावर चवर या फुलांचा बहर दिसत असून, इतर काही फुलंही तुरळक स्वरूपात उमलताना दिसत आहेत. पुढील काळात फुलांचा बहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, नेमका फुलांचा बहर हा पावसाचं प्रमाण आणि हवामानावर अवलंबून असतो.

पुण्याहून कास पठारावर कसं जायचं?

पुण्यापासून कास पठार सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने साताऱ्याच्या दिशेने जाऊन पुढे कास पठाराकडे जाता येतं. वाहतूक आणि हवामानानुसार पुण्याहून कासपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ३ ते ४ तास लागू शकतात.

सातारा हे कास पठारासाठी प्रमुख प्रवेशद्वार मानलं जातं. साताऱ्यापासून कास पठार सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे.

मुंबईहून कासला कसं पोहोचाल?

मुंबईहून कास पठाराचं अंतर सुमारे २७८ किलोमीटर आहे. मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ मार्गे साताऱ्यापर्यंत आणि त्यानंतर कास पठाराकडे जाता येतं. रस्त्यावरील वाहतूक आणि परिस्थितीनुसार मुंबईहून कासला पोहोचण्यासाठी साधारण ५ ते ६ तास लागू शकतात.

कास पठाराचा पूर्ण आनंद घ्यायचा असल्यास सकाळी लवकर प्रवास सुरू करणं अधिक सोयीचं ठरू शकतं.

रेल्वेने कास पठारावर कसं जायचं?

रेल्वेने जाणाऱ्या पर्यटकांसाठी सातारा रेल्वे स्थानक हा जवळचा प्रमुख पर्याय आहे. सातारा रेल्वे स्थानक मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांशी जोडलेलं आहे. रेल्वेने साताऱ्याला पोहोचल्यानंतर टॅक्सी, बस किंवा स्थानिक वाहनांच्या माध्यमातून कास पठारावर जाता येतं.

कास पठारासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक

कास पठार हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे पर्यटकांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रवेश व्यवस्थेत काही नियम करण्यात आले आहेत. कासला जाण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंग करणं महत्त्वाचं आहे.

बुकिंगसाठी www.kas.ind.in या वेबसाइटचा वापर करता येईल. विशेषतः शनिवार, रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी केवळ ऑनलाइन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी थेट कास पठारावर पोहोचून प्रवेश मिळेलच, असं नाही.

प्रवेश शुल्क किती?

कास पठारावर १२ वर्षांवरील पर्यटकांसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क आकारलं जातं. या शुल्कामध्ये पार्किंगच्या ठिकाणापासून कास पठारापर्यंत मोफत बस सेवा, प्रत्येक ग्रुपसाठी माहिती पत्रिका आणि वॉच टॉवरवरील दुर्बिणीतून कण्हेर जलाशय व परिसराचं दर्शन यांचा समावेश आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार, रविवार आणि सरकारी सुट्टीचे दिवस वगळता प्रति विद्यार्थी ४० रुपये शुल्क आहे. त्यासाठी संबंधित शाळेच्या प्राचार्यांचं पत्र आवश्यक आहे.

तसंच दहा जणांच्या ग्रुपसाठी एका तासाच्या गाइडसाठी २०० रुपये शुल्क, तर कुमुदिनी तलावापर्यंत इलेक्ट्रिक वाहन सफरीसाठी १०० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

पर्यटकांसाठी यंदा विशेष सुविधा

यंदा पर्यटकांसाठी कास पठार परिसरात काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकीव आणि कास तलाव निरीक्षण मनोऱ्यावर दुर्बिणी, हिरकणी कक्ष, पॅगोडा विश्रांती कक्ष, स्वागत कमानी, नैसर्गिक मंडपघळ, दगडी कमान, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.

कासला गेल्यानंतर केवळ फुलांचाच आनंद घेता येणार नाही, तर मंडपघळ, कुमुदिनी तलाव आणि राजमार्ग यांसारख्या परिसरातील ठिकाणांनाही भेट देता येणार आहे.

कासला जाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

कास पठार जितकं सुंदर आहे, तितकंच त्याचं पर्यावरण नाजूक आहे. त्यामुळे पर्यटकांनी फुलं तोडू नयेत, फुलांच्या पट्ट्यात प्रवेश करू नये आणि परिसरात कचरा टाकू नये. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.

कासची फुलं फक्त पाहण्यासाठी नाहीत, तर पुढच्या पिढीसाठी जपण्यासाठीही आहेत. त्यामुळे यंदा कास पठारावर जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी ऑनलाइन बुकिंग करा आणि या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद जबाबदारीने घ्या.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू