लहानपणीची आठवण ताजी करणारी चिंचेची कँडी; सोपी आणि झटपट रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

लहानपणीची आठवण ताजी करणारी चिंचेची कँडी; सोपी आणि झटपट रेसिपी

Imli Candy Recipe : आंबट, गोड आणि तिखट चवीची खट्टी-मीठी चिंचेची कँडी घरच्या घरी कशी बनवायची जाणून घ्या.

किशोरी घायवट-उबाळे

लहानपणी शाळेबाहेर मिळणारी खट्टी-मीठी चिंचेची गोळी आजही अनेकांच्या जिभेवर रेंगाळते. आंबट, गोड आणि तिखट चवीचा भन्नाट संगम असलेली ही चिंचेची कँडी आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात चटकदार काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते. कमी साहित्य, कमी खर्च आणि झटपट तयार होणारी ही इमली कँडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

साहित्य

  • २५० ग्रॅम चिंच

  • ३ कप पाणी

  • १५० ग्रॅम गूळ

  • १ टीस्पून मीठ

  • १ टीस्पून काळं मीठ

  • २ टेबलस्पून लाल तिखट

  • २ टेबलस्पून भाजलेली जिरेपूड

  • कँडीसाठी स्टिक किंवा चमचा

कृती :

सर्वप्रथम चिंचेचे कवच काढून ती गरम पाण्यात मऊ होईपर्यंत उकळून घ्या. चिंच पूर्ण मऊ झाल्यावर गाळणीच्या मदतीने तिचा गर काढून बिया वेगळ्या करा.

आता या गरात गूळ, मीठ आणि काळं मीठ घालून मध्यम आचेवर शिजवायला ठेवा. मिश्रण सतत हलवत राहा. साधारण ३० मिनिटांनी हे मिश्रण घट्ट होऊन पॅनच्या कडा सोडू लागेल.

मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताला हलकं तेल लावून स्टिकवर किंवा छोट्या गोळ्यांच्या आकारात कँडी तयार करा. तयार कँडीवर भाजलेली जिरेपूड किंवा लाल तिखट भुरभुरा. तयार आहे चटकदार, खट्टी-मीठी आणि झणझणीत चिंचेची होममेड कँडी.

टिप्स :

  • कँडी अधिक चविष्ट हवी असल्यास थोडी चाट मसाला पावडर घालू शकता.

  • मिश्रण जास्त पातळ राहिल्यास कँडी सेट होणार नाही, त्यामुळे ते व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवा.

  • एअरटाइट डब्यात ठेवल्यास या कँडी ८ ते १० दिवस सहज टिकतात.

  • मुलांसाठी बनवत असाल तर तिखटाचे प्रमाण कमी ठेवा.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी