मंगळागौरी हा नवविवाहितांसाठी खास आणि उत्साहाचा सण. या दिवशी नटून-थटून तयार होताना चेहऱ्यावर छान ग्लो असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी महागड्या पार्लर ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही साहित्यांच्या मदतीने तुम्ही मंगळागौरीच्या आदल्या दिवशी बीटरुट फेशियल करून पाहू शकता.
हे फेशियल करण्यासाठी बीटरुटसोबत तांदळाचं पाणी, कॉफी, साखर, ॲलोव्हेरा जेल, बेसन आणि गव्हाचं पीठ अशी साधी सामग्री लागणार आहे. हे फेशियल कसं करायचं, ते पाहूया.
बीटरुट फेशियल कसं करायचं?
पहिली स्टेप - चेहरा स्वच्छ करा
सर्वात आधी बीटरुट किसून त्याचा रस काढून घ्या. एका वाटीत एक चमचा बीटरुटचा रस आणि एक चमचा तांदळाचं पाणी घ्या. तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी तांदूळ ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवू शकता. या मिश्रणात कॉटन बुडवून त्याने चेहरा हलक्या हाताने स्वच्छ पुसून घ्या.
दुसरी स्टेप - स्क्रब करा
यानंतर एका वाटीत बीटरुटचा रस घ्या. त्यात एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा साखर मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मात्र त्वचेवर जास्त जोराने घासू नका. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
तिसरी स्टेप - मसाज
आता दोन चमचे बीटरुटच्या रसामध्ये एक चमचा ॲलोव्हेरा जेल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून साधारण ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. ॲलोव्हेरा जेल त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्यास मदत करते.
चौथी स्टेप - फेस पॅक
शेवटी बीटरुटच्या रसामध्ये एक चमचा बेसन आणि एक चमचा गव्हाचं पीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण १५ मिनिटे ठेवून द्या. पॅक सुकल्यानंतर चेहरा हलक्या हाताने स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा. शेवटी त्वचेला मॉइश्चरायझर लावा.
मंगळागौरीच्या आदल्या दिवशी हे घरगुती फेशियल करून पाहू शकता. मात्र कोणतेही नवीन घटक चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल. संवेदनशील त्वचा असल्यास स्क्रबिंग टाळा.