लाईफस्टाईल

Narali Purnima 2025 : यंदाची नारळी पौर्णिमा कधी आहे? पूजेची योग्य पद्धत काय? यामागचं महत्त्व जाणून घ्या

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज समुद्राची विधीवत पूजा करतो आणि समुद्रदेवतेला नारळ अर्पण करून प्रार्थना करतो. पण, या दिवसाचं महत्त्व तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर जाणून घेऊया, यंदाची नारळी पौर्णिमा कधी आहे? पूजेची योग्य पद्धत काय आणि यामागचं महत्त्व काय आहे?

Mayuri Gawade

श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल. या महिन्यात एकापाठोपाठ एक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा असाच एक खास सण म्हणजे नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज समुद्राची विधीवत पूजा करतो आणि समुद्रदेवतेला नारळ अर्पण करून प्रार्थना करतो. चला तर जाणून घेऊया यंदाची नारळी पौर्णिमा कधी आहे, पूजेची योग्य पद्धत काय आणि यामागचं महत्त्व काय आहे…

यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

यंदा श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी २:१२ वाजता होईल आणि या पौर्णिमेची समाप्ती शनिवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १:२४ वाजता होईल. नारळी पौर्णिमेदिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी ७: २७ ते ९:०७ वाजेपर्यंत असेल. तर, दुपारी मुहूर्त १२:२६ ते २:०६ वाजेपर्यंत राहील.

नारळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते?

नारळी पौर्णिमा साजरी करताना कोळी समाज काही दिवस आधीपासूनच तयारीला लागतो. मासेमारीची जुनी जाळी दुरुस्त केली जाते, बोटींना रंग देऊन त्यांना सजवलं जातं आणि काहीजण नवीन बोटीही खरेदी करतात. बोटींना पताका लावल्या जातात, फुलांनी सजावट केली जाते. पूजेच्या दिवशी पारंपरिक पोशाखात कोळी बांधव समुद्रकिनारी एकत्र येतात. नारळ, मिठाई, फळं आणि नैवेद्य घेऊन समुद्रदेवतेची पूजा केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करण्यामागे श्रद्धा असते की, वरुण देव प्रसन्न होवो, समुद्र शांत राहो आणि मासेमारीचा हंगाम सुखरूप जावो.

नारळ हे शुभतेचं आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळेच या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. पूजेनंतर घराघरात नारळी भात आणि इतर गोड पदार्थ बनवले जातात, पारंपरिक गाणी, नृत्य आणि एकत्र येऊन हा सण आनंदात साजरा केला जातो.

नारळी पौर्णिमेचं खास महत्त्व

नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्रात, कोळी समाजामध्ये या सणाला खूप मोठं महत्त्व आहे. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि समुद्राला नारळ अर्पण केला जातो.

या पूजेचे मुख्य उद्देश म्हणजे जलतत्त्वाचे अधिष्ठाता असलेल्या वरुण देवाची आराधना करणे आणि मच्छीमार बांधवांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करणे हा आहे. समुद्र हा त्यांचा उपजीविकेचा स्रोत असल्यामुळे त्याच्याशी ऋणानुबंध जपण्यासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

पावसाळ्याच्या दिवसांनंतर, समुद्र थोडा शांत झालेला असतो. याच काळात मासेमारीचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे कोळी समाजासाठी हा दिवस नवीन सुरुवातीचा आणि सकारात्मक आशेचा असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक वेशात सागरकिनारी जाऊन सामूहिक पूजा केली जाते आणि नारळ अर्पण करून समुद्रदेवतेचा आशीर्वाद घेतला जातो. हा सण म्हणजे फक्त एक धार्मिक परंपरा नसून, निसर्गाशी असलेलं नातं, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर प्रसंग आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती