भारतात सण-उत्सव म्हणजे भक्ती, आनंद आणि परंपरेचं अप्रतिम मिलन. अशाच सणांमध्ये नवरात्री हा एक प्रमुख उत्सव आहे. या काळात नऊ दिवस शक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीच्या प्रत्येक रूपाला वेगवेगळ्या नैवेद्याची आवड असल्याचं मानलं जातं. नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीला तिचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने ती प्रसन्न होते, मनोकामना पूर्ण करते आणि भक्ताला आरोग्य, संपत्ती व सौभाग्य प्रदान करते, अशी श्रद्धा आहे.
यंदा शारदीय नवरात्री २२ सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि ३० सप्टेंबरला संपन्न होणार आहे. या नऊ दिवसांत तुम्ही कोणते नैवेद्य देवीला अर्पण करावेत आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय आहे, हे जाणून घ्या -
नऊ दिवस, नऊ रूपं आणि त्यांचे नैवेद्य
१. शैलपुत्री - शुद्ध तुपाची मिठाई
पहिल्या दिवशी हिमालयपुत्री शैलपुत्रीची पूजा केली जाते. गायीच्या दुधापासून बनवलेले तूप आणि त्यापासून बनवलेली मिठाई अर्पण केल्याने दीर्घायुष्य व आरोग्य लाभते.
२. ब्रह्मचारिणी - साखर व पंचामृत
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला साखर व पंचामृत अर्पण करतात. या नैवेद्याने संयम, दृढनिश्चय आणि आयुष्यभर उत्तम आरोग्य मिळते, अशी श्रद्धा आहे.
३. चंद्रघंटा - खीर किंवा दुधाची मिठाई
तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीला खीर अर्पण करतात. या नैवेद्याने घरातील अडचणी दूर होतात, समृद्धी आणि शांती वाढते.
४. कुष्मांडा - मालपुआ
चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीला मालपुआ अर्पण केल्यास बुद्धी, ज्ञान आणि सकारात्मक उर्जा प्राप्त होते.
५. स्कंदमाता - केळी
पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला पिकलेली केळी अर्पण करतात. त्यामुळे कौटुंबिक सुख-शांती लाभते.
६. कात्यायनी - मध आणि गोड पान
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला मध आणि गोड पान अर्पण करतात. यामुळे विवाहसंबंधी अडथळे दूर होतात, सौंदर्य आणि आकर्षण वाढते.
७. कालरात्री - गुळाची मिठाई
सातव्या दिवशी कालरात्री देवीला गुळ किंवा त्यापासून बनवलेली मिठाई अर्पण करतात. त्यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि शत्रूंचा नाश होतो.
८. महागौरी - नारळ
आठव्या दिवशी महागौरी देवीला नारळ किंवा नारळाची मिठाई अर्पण केली जाते. या नैवेद्याने जीवनात शुद्धता आणि शांतता येते.
९. सिद्धिदात्री - खीर, पुरी, शिरा
नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीला खीर, पुरी किंवा शिरा अर्पण करतात. या नैवेद्याने सर्व प्रकारच्या सिद्धी आणि यश प्राप्त होतं.
नैवेद्य अर्पणामागचं महत्त्व
नैवेद्य हा केवळ अन्नाचा ताट नसतो, तो भक्ती आणि कृतज्ञतेचं प्रतीक मानला जातो.
देवीला आवडणारे अन्न अर्पण केल्याने भक्ताला त्या रूपाच्या गुणांचा आशीर्वाद मिळतो.
आयुर्वेदाच्या दृष्टीनेही हे अन्न शरीराला उर्जा, संतुलन आणि आरोग्य प्रदान करतात.
भक्तांसाठी टिप्स
नैवेद्य तयार करताना शुद्धता आणि सात्विकता पाळा.
नैवेद्य देवीला अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून कुटुंबीयांमध्ये वाटावा.
दररोज देवीच्या रूपानुसार मंत्रजप आणि आरतीसह नैवेद्य अर्पण केल्याने अधिक शुभफल मिळते.
नवरात्री म्हणजे केवळ उपवास आणि पूजाच नाही, तर श्रद्धा, शिस्त आणि भक्तीचा उत्सव आहे. योग्य नैवेद्य अर्पण करून तुम्ही या नऊ दिवसांत देवीची विशेष कृपा मिळवू शकता.
(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)