सततचा उन्हातला वावर, धूळ-माती, प्रदूषण आणि बदललेली जीवनशैली यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग, काळपटपणा आणि डार्क स्पॉट्स वाढत चालले आहेत. महागड्या क्रीम्स, फेशियल्स करूनही अपेक्षित फरक पडत नसेल, तर स्वयंपाकघरातला एक साधा पदार्थ तुमच्या उपयोगी ठरू शकतो. तो म्हणजे जायफळ.
प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर रोहित सचदेव याने त्याच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये जायफळाचे त्वचेसाठीचे ५ सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. कमी खर्चात, घरच्या घरी करता येणारे हे उपाय त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करतात.
पिग्मेंटेशन आणि काळ्या डागांसाठी जायफळ उपाय
जायफळ थोडं कापून त्यावर दुधाचे काही थेंब टाका आणि सहानीवर उगाळा. दुधाचा रंग बदलल्यानंतर तयार झालेला लेप काळ्या डागांवर किंवा पिग्मेंटेशन असलेल्या भागावर लावा.
१०-१५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून २ वेळा केल्यास डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत होते.
टॅनिंग कमी करण्यासाठी स्किन ब्राइटनिंग मास्क
चेहऱ्यावर डलनेस किंवा उन्हामुळे टॅनिंग असेल, तर जायफळ मधासोबत उगाळा. हा लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर हलक्या हाताने धुवा. मध त्वचेला ओलावा देतो तर जायफळ टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
सुरकुत्यांसाठी अँटी-एजिंग नाईट क्रीम
जायफळाची बारीक पावडर करून त्यात कोरफड जेल आणि बदामाचे तेल मिसळा. ही घरगुती नाईट क्रीम रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. नियमित वापर केल्यास फाईन लाईन्स कमी होण्यास आणि त्वचा घट्ट राहण्यास मदत होते.
ब्लॅकहेड्ससाठी क्लिअर स्किन स्क्रब
जायफळ पावडरमध्ये दही आणि चिमूटभर कॉफी पावडर मिसळा. हा स्क्रब चेहऱ्यावर लावून अतिशय हलक्या हाताने मसाज करा. त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि ब्लॅकहेड्स-व्हाईटहेड्स कमी होण्यास मदत होते.
त्वचा डिटॉक्ससाठी जायफळ स्टीम
गरम पाण्यात थोडी जायफळ पावडर टाकून वाफ घ्या. ही स्टीम त्वचेतील घाण आणि विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. आठवड्यातून एकदाच हा उपाय करा.
वापरण्यापूर्वी लक्षात ठेवा
जायफळ खूप उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे जास्त प्रमाणात वापर टाळा
संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा
आठवड्यातून २-३ वेळांपेक्षा जास्त वापर करू नका
थोडक्यात सांगायचं तर, महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सपेक्षा जायफळासारखा स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय योग्य पद्धतीने वापरला, तर त्वचेचा रंग सुधारण्यास आणि चेहऱ्यावर नैसर्गिक निखार आणण्यास नक्कीच मदत होऊ शकते.