रवींद्र राऊळ/मुंबई
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करा आणि अल्पावधीत कैकपट परतावा मिळेल, या व्हॉट्सॲपवर आलेल्या अनोळखी महिलेच्या मेसेजवर विश्वास ठेवत तिने पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून तिच्या बँक खात्यात २२ लाख रुपये जमा केल्याने डोंबिवलीतील तरुणावर पश्चात्तापाची वेळ आली आहे. वर्षानुवर्षे परिश्रम घेऊन गोळा केलेल्या या रकमेवर त्याला पाणी सोडावे लागले. गुंतवणुकीचे पारंपरिक मार्ग सोडून अशा फसव्या ऑनलाइन ऑफर्सना बळी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
आमच्यामार्फत पैसे गुंतवा, असे आवाहन करणारे मेसेज पाठवत लाखो रुपयांना गंडा घालण्याचे प्रकार सध्या भरमसाट वाढले आहेत. पण गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन लुबाडणुकीचा हा काही एकमेव मार्ग नाही. गुंतवणूकदारांसाठी असे अनेक सापळे आहेत. गुंतवणुकीवर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल, या गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून नानाविध गुंतवणूक योजना ऑनलाइन सादर करत लाखो रुपयांना चुना लावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.
ऑनलाइन गुंतवणूक घोटाळ्यांमध्ये समावेश असतो तो भरघोस नफा देणाऱ्या फसव्या योजनांचा. ते दामदुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देतात. वरकरणी उत्तम वाटणाऱ्या या योजना गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा गुंतवण्यास भरीस पाडतात. हे घोटाळेबाज कायदेशीर आर्थिक व्यवहारांमधून नफा मिळविण्याऐवजी सुरुवातीला जुन्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूकदारांचे पैसे देतात. यातून गुंतवणूकदारांचा त्या योजनांवर ठाम विश्वास बसतो. त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या नातेवाईक आणि परिचित त्याबाबतची माहिती देऊन त्यांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडतात.
बऱ्यापैकी रक्कम हाती लागली की एक दिवस अचानक हे सायबर गुन्हेगार संपर्क तोडून टाकतात. भरघोस नफा सोडाच, गुंतवणुकीच्या रकमेवरही पाणी सोडण्याची पाळी येते. हे सारे व्यवहार ऑनलाइन होत असल्याने आणि कार्यालयाचा ठावठिकाणा माहीत नसल्याने कुणाकडे दाद मागण्याचीही सोय राहत नाही. याला पोंझी योजना असेही म्हणतात. पूर्वी हे प्रकार ऑफलाइन होत. बेजबाबदार गुंतवणूकदारांमुळे या सायबर गुन्हेगारांचे भलतेच फावते.
काय कराल?
नोंदणीकृत वित्तीय संस्थांमध्येच गुंतवणूक करा : गुंतवणुकीसाठी फक्त सेबी-नोंदणीकृत मध्यस्थांशी व्यवहार करा.
गुंतवणूक योजना तपासून घ्या : नेहमी नियमन केलेल्या वित्तीय संस्थांद्वारे गुंतवणूक करा.
माहिती ठेवा : नियमन केलेल्या संस्था आणि वित्तीय योजनांची विश्वसनीय माहिती जाणून घ्या. आपल्या गुंतवणुकीची रक्कम नेमकी कशी गुंतवली जात आहे याची सविस्तर माहिती घ्या.
संशयास्पद व्यवहारांची तक्रार करा : फसवणूक होण्याचे प्रकार झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करा.
काय टाळाल?
चौकस राहा : शांतपणे ऑफर सखोल तपासूनच स्वीकारा.
अविश्वसनीय परताव्यावर विश्वास ठेवू नका : कोणत्याही जोखिमेशिवाय भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या योजना टाळा.
संशयास्पद कंपन्यांमध्ये सामील होऊ नका : संशयास्पद ट्रेडिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या सोशल मीडिया गटांपासून दूर रहा.
धोक्यांकडे दुर्लक्ष करू नका : परतावा बऱ्याच विलंबाने मिळत असेल किंवा खूप जास्त वाटत असेल तर सावधगिरी बाळगा.