रवींद्र राऊळ/मुंबई
‘ऑनलाइन लॉटरी’त अथवा ‘लकी ड्रॉ’मध्ये लाखो डॉलरचे इनाम लागल्याचा मेसेज मोबाइल, मेल अथवा व्हॉट्सॲपवर तुम्हाला आला असेल तर आनंदित होण्याचे अजिबात कारण नाही. अशा फ्रॉड ऑनलाइन लॉटरीच्या मोहात पडून अनेकजण कंगाल झाले आहेत. फसव्या लॉटरी ॲपचा तर इतका सुळसुळाट झाला आहे की प्ले स्टोअरवरून अशा ॲप आणि फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपद्वारे पसरवल्या जाणाऱ्या बनावट लॉटरीच्या जाहिराती बंद कराव्यात, अशी नोटीसच केरळ पोलिसांनी गुगलला दिली आहे.
अलीकडेच ७४ वर्षांच्या सेवानिवृत्त वृद्धाला लॉटरी लागल्याचे भासवत त्याच्याकडून ‘स्कॅमर’नी सव्वातीन लाख रुपये उकळले. एका महिलेला मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून पावणेतीन कोटींची ऑनलाइन लॉटरी लागल्याचा बनावट मेसेज पाठवून तिच्याकडून ९२ हजार रुपये लाटण्यात आले. या लॉटरी घोटाळ्याची सुरुवात होते ती एका ‘ई-मेल नोटिफिकेशन’ अथवा फोन कॉलने ज्यात तुम्हाला जॅकपॉट लागल्याचा दावा केला जातो. ते ऐकूनच लॉटरी लागलेला इतका हरखून जातो की आपण कधी लॉटरी काढली होती, असा प्रश्न त्याला पडत नाही. पडलाच तर तुमचा मोबाईल क्रमांक ‘लकी ड्रॉ’मध्ये आल्याचे सांगितले जाते आणि त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. लाखो डॉलर्सची ती रक्कम परदेशातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भरमसाठ प्रक्रिया शुल्काची मागणी केली जाते.
कधी शुल्काच्या नावाने पैसे उकळले जातात तर कधी वैयक्तिक माहिती शेअर करण्यास भाग पडून फसवले जाते. या दोन्ही प्रकारात फसवणूक ही ठरलेलीच. कारण एकतर प्रक्रिया शुल्क त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करून बक्षीस काही येत नाही, तर कधी बँक खातेच रिकामे होते.
या योजना इतक्या भुरळ घालणाऱ्या असतात की त्या आमिषापोटी सारासार विचार न करता सर्वसामान्य त्याला बळी पडतात. हे प्रमाण इतके मोठे आहे आणि फसल्यानंतर बँकेकडे धाव घेणाऱ्यांची संख्या इतकी आहे की अखेर अशा बनावट लॉटरी घोटाळ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन अनेक बँकांना करावे लागले.
काय कराल?
शुल्क भरू नका : फसवणूक करणारे अनेकदा कर, शिपिंग शुल्क किंवा खोट्या बक्षिसांसाठी हाताळणी शुल्क मागतात. कोणत्याही लॉटरीसाठी कधीही पैसे पाठवू नका.
अवास्तव दाव्यांवर प्रश्न विचारा : अनपेक्षित लॉटरी जिंकण्याच्या संदेशांपासून सावध राहा.
फसवणुकीची तक्रार करा : लॉटरी घोटाळ्याचा संशय असल्यास त्वरित पोलीस अधिकाऱ्यांना कळवा.
चौकस राहा : लक्षात ठेवा, कोणीही मोठ्या प्रमाणात पैसे मोफत देत नाही.
काय टाळाल?
कागदपत्रे देऊ नका : कधीही वैयक्तिक तपशील देऊ नका किंवा लॉटरीच्या बक्षिसासाठी दावा करू नका.
बनावट अधिकाऱ्यांपासून सावध राहा : आरबीआय सार्वजनिक खाती ठेवत नाही, ठेवी मागत नाही किंवा वैयक्तिक/बँक तपशिलांची मागणी करत नाही.
बनावट संदेशांकडे दुर्लक्ष करा : बक्षिसांशी संबंधित बक्षिसे, सरकारी मदत किंवा केवायसी अपडेट्स देण्याचे आश्वासन देणाऱ्या ऑफरना प्रतिसाद देणे टाळा.