प्रसूतीनंतर सतत चिंता वाटतेय? नैराश्याची असू शकते सुरुवात; वाचा तज्ज्ञांचा सल्ला  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

प्रसूतीनंतर सतत चिंता वाटतेय? नैराश्याची असू शकते सुरुवात; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

मानसिक आरोग्य समस्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर त्याचा परिणाम आईच्या आरोग्यासोबतच बाळाशी असलेल्या नात्यावरही होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : बाळाच्या जन्मानंतर थकवा, चिडचिड, रडू येणे किंवा भावनिक चढ-उतार होणे हे अनेकजण सामान्य समजतात. मात्र, हीच लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिली तर ती प्रसूतीनंतरच्या नैराश्याची (Postpartum Depression) किंवा प्रसूतीनंतरच्या चिंतेची (Postpartum Anxiety) सुरुवात असू शकते. या मानसिक आरोग्य समस्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर त्याचा परिणाम आईच्या आरोग्यासोबतच बाळाशी असलेल्या नात्यावरही होऊ शकतो, असा इशारा सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या संचालक डॉ. आशा दलाल यांनी दिला आहे.

'बेबी ब्लूज' आणि नैराश्य यात फरक ओळखा

बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही दिवसांत मन अस्थिर होणे, रडू येणे किंवा भावनिक होणे याला 'बेबी ब्लूज' म्हटले जाते. ही अवस्था साधारणपणे दोन आठवड्यांत कमी होते. मात्र, लक्षणे त्यापेक्षा जास्त काळ टिकून राहिली किंवा तीव्र झाली, तर ती प्रसूतीनंतरच्या नैराश्याची चिन्हे असू शकतात.

दुर्लक्षित राहणारी सुरुवातीची लक्षणे

  • सतत चिंता वाटणे - बाळ सुरक्षित आहे का, याची वारंवार खात्री करून घेण्याची गरज वाटणे.

  • कारण नसताना चिडचिड होणे - झोपेच्या कमतरतेपलीकडे सतत राग, तणाव किंवा अस्वस्थता जाणवणे.

  • आवडत्या गोष्टींमध्ये रस कमी होणे - पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टींमध्येही मन न लागणे.

  • भीतीदायक विचार वारंवार येणे - बाळाला काही अपघात होईल किंवा इजा होईल, अशा अनिच्छित विचारांनी त्रस्त होणे.

  • शारीरिक त्रास जाणवणे - हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दडपण, मळमळ किंवा घाबरल्यासारखे वाटणे.

  • बाळाशी भावनिक नाते जोडण्यात अडचण - बाळाबद्दल प्रेम किंवा जिव्हाळा व्यक्त करण्यात अडथळा जाणवणे किंवा भावनाशून्यता वाटणे.

  • प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा अट्टहास - बाळाच्या दिनक्रमाबाबत अतिप्रमाणात काळजी घेणे आणि सतत तणावाखाली राहणे.

कोणत्या महिलांमध्ये धोका अधिक?

  • पूर्वी नैराश्य किंवा चिंतेचा इतिहास

  • कुटुंबाचा आधार कमी असणे

  • वैवाहिक तणाव

  • झोपेची तीव्र कमतरता

  • कठीण प्रसूती

  • गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत

  • आर्थिक ताण

  • नवजात बाळाला NICU मध्ये उपचारांची गरज भासणे

वेळीच निदान महत्त्वाचे

डॉ. आशा दलाल यांच्या मते, प्रसूतीनंतरच्या तपासणीदरम्यान एडिनबर्ग पोस्टनॅटल डिप्रेशन स्केल (EPDS) सारख्या प्रमाणित चाचण्यांच्या मदतीने या समस्येचे लवकर निदान करता येते. यासाठी महिलांनी आपल्या भावना आणि लक्षणे मोकळेपणाने सांगणे आवश्यक आहे.

कुटुंबाची भूमिका तितकीच महत्त्वाची

आईच्या वागण्यात किंवा भावनिक स्थितीत सातत्याने बदल दिसत असतील, तर कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी तिला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

उपचाराने पूर्णपणे बरे होऊ शकते

प्रसूतीनंतरची चिंता किंवा नैराश्य ही कमजोरी नसून उपचारयोग्य मानसिक आरोग्य समस्या आहे. योग्य समुपदेशन, मानसोपचार, आवश्यक जीवनशैलीतील बदल, कुटुंबाचा आधार आणि गरजेनुसार औषधोपचार यांच्या मदतीने बहुतांश महिला पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात आणि आपल्या बाळासोबत निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकतात.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह