पास्ता म्हटलं की अनेकांना वाटतं की तो घरी बनवणं अवघडच! सॉस, भाज्या, योग्य चव जमवणं हे सगळंच क्लिष्ट आहे असं अनेकांचं मत असतं. पण प्रत्यक्षात थोडीशी तयारी आणि योग्य पद्धत वापरली, तर फक्त १५ मिनिटांत चविष्ट रेड सॉस पास्ता तयार होऊ शकतो. घाईगडबडीच्या वेळी, लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा अचानक काहीतरी वेगळं खायचं असेल, तर ही रेसिपी नक्की उपयोगी ठरेल. चला तर मग पाहूया ही झटपट आणि सोपी रेसिपी...
साहित्य:
पास्ता
कांदा (बारीक चिरलेला)
टोमॅटो (चिरलेले)
शिमला मिरची
लसूण पाकळ्या
मीठ (चवीनुसार)
काळीमिरी पावडर
तेल / बटर
फ्रेश क्रीम
किसलेले चीज
कृती :
रेड सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम टोपात पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडे मीठ घालून पास्ता शिजवून घ्या. पास्ता शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि थंड पाण्याखाली धुऊन बाजूला ठेवा. आता कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मंद आचेवर मऊ होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यात शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा थोडावेळ शिजवा. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून पाणी न घालता बारीक पेस्ट तयार करा. कढईमध्ये बटर गरम करून त्यात ही तयार पेस्ट घाला आणि तेल सुटेपर्यंत नीट परतून घ्या. त्यानंतर त्यात फ्रेश क्रीम, किसलेले चीज आणि काळीमिरी पावडर घालून सगळं मिश्रण एकजीव करा. शेवटी शिजवलेला पास्ता त्यात घालून २ ते ३ मिनिटं मंद आचेवर शिजवा आणि गॅस बंद करा. गरमागरम रेड सॉस पास्ता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
टिप्स:
पास्ता शिजवताना तो पूर्ण मऊ न करता थोडा अल-डेंटे ठेवा, त्यामुळे चव अधिक छान लागते.
लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची किंवा जास्त मसाले टाळा.
अधिक पौष्टिकतेसाठी गाजर, स्वीट कॉर्न किंवा ब्रोकोलीही घालू शकता.
चीज आवडत नसेल तर कमी प्रमाणात किंवा टाळू शकता.