कच्चं बीट रोज खाताय? थांबा! आधी हे जाणून घ्या; नाहीतर पोटाचे त्रास वाढू शकतात 
लाईफस्टाईल

कच्चं बीट रोज खाताय? थांबा! आधी हे जाणून घ्या; नाहीतर पोटाचे त्रास वाढू शकतात

कच्चं बीट खाणं आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असेल असं नाही. चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास पोटाचे त्रास वाढू शकतात. बीट खाण्याची योग्य पद्धत, फायदे आणि घ्यायची काळजी जाणून घ्या.

Mayuri Gawade

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा, पचन व्यवस्थित राहावं आणि ऊर्जा टिकून राहावी, यासाठी अनेकजण आहारात बीटाचा समावेश करतात. सॅलड, ज्यूस किंवा थेट कच्चं बीट खाण्याची सवयही बऱ्याच जणांमध्ये दिसते. पण "हेल्दी आहे" म्हणून रोज कच्चं बीट खाणं प्रत्येकासाठी योग्यच असेल, असं नाही. चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास बीट फायद्याऐवजी त्रासदायकही ठरू शकतं.

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, बीटमध्ये पोषक घटक मुबलक असले तरी ते कसं, किती आणि केव्हा खायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

कच्चं बीट पोटासाठी जड ठरू शकतं
अनेकजण सॅलडमध्ये कच्चं बीट खातात. मात्र, काही लोकांना त्यामुळे पोट फुगणे, गॅस, जुलाब किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. ज्यांची पचनसंस्था संवेदनशील असते, त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

किडनी स्टोनचा त्रास असेल तर सावध राहा
बीटामध्ये ऑक्सलेटचं प्रमाण तुलनेने जास्त असतं. हे ऑक्सलेट कॅल्शियमसोबत एकत्र आल्यास किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी कच्चं बीट खाणं टाळणंच योग्य ठरतं.

कच्च्या बीटामुळे जंतुसंसर्गाचाही धोका
बीट हे जमिनीत उगवणारं कंदमूळ आहे. त्यामुळे त्यावर माती, बॅक्टेरिया किंवा सूक्ष्मजंतू असण्याची शक्यता असते. नीट धुतलं नाही किंवा स्वच्छ केलं नाही, तर त्याचा तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

मग बीट खायचं कसं?
बीट पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. पण ते उकळून, वाफवून किंवा हलकं शिजवून खाल्ल्यास ते अधिक सुरक्षित आणि पचायला सोपं ठरतं. बीटाची भाजी, पराठे, सूप किंवा हलकं शिजवलेलं सॅलड हे चांगले पर्याय ठरू शकतात.

उपाशीपोटी बीट खाणं टाळा
काही लोक सकाळी रिकाम्या पोटी बीटाचा ज्यूस पितात. पण यामुळे काहींना पचनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे बीट जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाणं अधिक योग्य मानलं जातं.

प्रमाणही तितकंच महत्त्वाचं
बीट पौष्टिक असलं तरी त्याचं अति सेवन टाळायला हवं. मर्यादित प्रमाणात बीट खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक चांगल्या प्रकारे मिळतात आणि दुष्परिणामांचाही धोका कमी राहतो.

बीटामध्ये नेमकं काय असतं?
बीटामध्ये फायबर, नायट्रेट्स, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन ए, बी, सी यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो आणि अ‍ॅनिमियामध्येही ते उपयुक्त मानलं जातं.

बीट हे नक्कीच आरोग्यासाठी चांगलं आहे. पण ते कच्चं, जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्रासही होऊ शकतो. त्यामुळे बीट योग्य पद्धतीने, मर्यादित प्रमाणात आणि शक्यतो शिजवून खाल्ल्यासच त्याचे खरे फायदे मिळतात.

Mumbai : मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नको! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन

MPSC आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली; रोहित पवार २७ सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम

Bhiwandi : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार