Photo : freepik
लाईफस्टाईल

चहा प्रेमींनो लक्ष द्या! ॲसिडिटी आणि शुगरचा धोका वाढू शकतो; चहा बनवण्याची 'ही' पद्धत वेळीच बदला

भारतामध्ये चहा म्हणजे फक्त पेय नाही, तर दिवसाची सुरुवात, कामाचा ब्रेक आणि अनेकांसाठी तर थकवा घालवण्याचा एकमेव उपाय. सकाळी उठताच चहा, दुपारी ऑफिसमध्ये चहा आणि संध्याकाळी पुन्हा चहा… पण हा आवडता चहा चुकीच्या पद्धतीने केला तर तोच चहा शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो.

Mayuri Gawade

भारतामध्ये चहा म्हणजे फक्त पेय नाही, तर दिवसाची सुरुवात, कामाचा ब्रेक आणि अनेकांसाठी तर थकवा घालवण्याचा एकमेव उपाय. सकाळी उठताच चहा, दुपारी ऑफिसमध्ये चहा आणि संध्याकाळी पुन्हा चहा… पण हा आवडता चहा चुकीच्या पद्धतीने केला तर तोच चहा शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो.

ॲसिडिटी, पित्त, पोट जड होणं, साखर वाढणं अशा तक्रारींचं मूळ अनेकदा चहाची चुकीची सवय असते. म्हणूनच चहा पिण्याबाबत आणि चहा बनवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

चहा उकळण्याची चूक टाळा

चहामधील टॅनिन आणि कॅफिन हे घटक जास्त वेळ उकळल्यास पोटातील आम्लता वाढवतात. अनेकजण चहा पावडर, दूध आणि पाणी एकत्र करून खूप वेळ उकळतात ही सवय सर्वात घातक आहे.

योग्य पद्धत म्हणजे आधी पाणी उकळून घ्यायचं. गॅस बंद करून त्यात चहा पावडर घालायची आणि भांड्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे तसेच ठेवायचं. याला इन्फ्युजन पद्धत म्हणतात. यामुळे चहाचा अर्क उतरतो, पण शरीरावर ताण पडत नाही.

दूध आणि साखर कधी घालावी?

दुधाचा चहा आवडत असेल, तर चहाचा अर्क तयार झाल्यावर वरून गरम दूध घालावं. साखर किंवा गुळही शेवटीच घालावा. गुळ आधी घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते आणि चहा पचनास जड होतो.

मसाल्यांचा वापर करा, पण मर्यादेत

चहामध्ये आले, वेलची, लवंग किंवा तुळशीची पाने टाकल्याने चहा पचनासाठी अधिक उपयुक्त ठरतो. हे घटक चहाचा दाहक गुणधर्म कमी करतात आणि पोटावर होणारा त्रास टाळतात.

रिकाम्या पोटी चहा नकोच

सकाळी उठताच चहा पिण्याची सवय अनेकांना असते. मात्र, रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पित्त वाढतं आणि भूक मंदावते. चहा पिण्याआधी एक ग्लास कोमट पाणी पिणं नेहमी फायदेशीर ठरतं.

दिवसातून किती चहा प्यावा?

दिवसातून २ ते ३ कप चहा पुरेसा आहे. यापेक्षा जास्त चहा घेतल्यास झोपेवर, मज्जासंस्थेवर आणि रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.

चहा सोडायची गरज नाही, फक्त त्याची पद्धत बदला. योग्य रीतीने बनवलेला चहा तुम्हाला त्रास देणार नाही, उलट दिवस ताजातवाना करेल.

(Disclaimer : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याची नवशक्ती पुष्टी करत नाही.)

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार