घरात आणलेली केळी अनेकदा जास्त पिकल्यामुळे मऊ आणि काळसर होतात. अशी केळी खाण्याची इच्छा होत नाही आणि ती अनेकदा फेकून दिली जातात. मात्र, या पिकलेल्या केळ्यांचा वापर केसांसाठी तयार करण्यात येणाऱ्या घरगुती लेपात करता येऊ शकतो. केळी, तांदळाचे पीठ आणि कोरफडीचा गर या तीन पदार्थांपासून हा लेप तयार करता येतो. केसांना मऊपणा आणि चमक मिळावी यासाठी हा उपाय करून पाहू शकता.
केसांसाठी केळीचा लेप कसा तयार कराल?
हा लेप बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडे गरम पाणी घालून व्यवस्थित मिसळा. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेत त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात एक पिकलेले केळे घ्या. त्यात ताज्या कोरफडीचा गर मिसळा. त्यानंतर तयार केलेली तांदळाच्या पिठाची पेस्टही त्यात घाला. हे तिन्ही पदार्थ मिक्सरमधून फिरवून एकजीव करून घ्या. अशा प्रकारे केसांसाठी घरगुती लेप तयार होईल.
केसांना लेप लावण्याची योग्य पद्धत
तयार केलेला लेप केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत व्यवस्थित लावा. केसांच्या सर्व भागांना तो लागेल याची काळजी घ्या. साधारण अर्धा तास हा लेप केसांवर राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवा.
आठवड्यातून किती वेळा वापरावा?
या घरगुती उपायाचा वापर आठवड्यातून दोन वेळा करता येऊ शकतो, असे या पद्धतीत सुचवले आहे. मात्र, प्रत्येकाच्या केसांचा प्रकार आणि त्वचेची संवेदनशीलता वेगळी असते. त्यामुळे लेप वापरण्यापूर्वी त्याची थोडीशी मात्रा त्वचेच्या छोट्या भागावर लावून तपासून पाहा. खाज, जळजळ किंवा त्रास जाणवल्यास वापर करू नका.
(डिस्क्लेमर : हा घरगुती उपाय असून, प्रत्येकाच्या केसांवर त्याचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. केस किंवा टाळूशी संबंधित समस्या अथवा अॅलर्जी असल्यास वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा; या उपायाच्या परिणामांची नवशक्ती हमी देत नाही.)