श्रावणातील उपवासाच्या दिवसांसाठी नेहमी तेच पदार्थ करून कंटाळा आला असेल, तर यावेळी गोडात काहीतरी वेगळं करून पाहा. घरात असलेल्या मोजक्या साहित्यापासून तयार होणारी ही दूध बर्फी चवीला मऊसूत आणि बनवायलाही अगदी सोपी आहे.
दूध, साखर आणि मक्याचं पीठ (कॉर्नफ्लोअर) या तीनच पदार्थांपासून ही बर्फी तयार करता येते. विशेष म्हणजे खवा किंवा इतर अनेक साहित्याची गरज नसल्याने अचानक गोड पदार्थ करायचा असेल तरी ही रेसिपी सहज करता येते.
दूध बर्फीसाठी साहित्य
दूध - ३ कप
साखर - दीड कप
कॉर्नफ्लोअर - ३ चमचे
अशी बनवा मऊसूत दूध बर्फी
सर्वप्रथम एका पसरट कढईत किंवा पॅनमध्ये दूध घ्या आणि ते गरम होऊ द्या. दूध उकळीला आल्यानंतर त्यात साखर घालून व्यवस्थित ढवळा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर दूध थोडं आटू द्या.
दरम्यान, एका छोट्या वाटीत कॉर्नफ्लोअर घ्या. त्यात थोडं कच्चं दूध घालून गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने पेस्ट तयार करा. ही पेस्ट गरम होत असलेल्या दुधात हळूहळू घालत सतत ढवळत राहा.
काही वेळाने दूध घट्ट होऊ लागेल. मिश्रणाला बर्फीसारखा घट्टपणा येऊन ते चमच्याला चिकटू लागलं की गॅस बंद करा.
आता एका भांड्यात बटर पेपर लावून त्यावर हे गरम मिश्रण ओता. ते व्यवस्थित पसरवून किमान ४ तास सेट होण्यासाठी ठेवा. बर्फी पूर्ण सेट झाल्यानंतर ती ताटात काढून चौकोनी तुकडे करा.
तयार झाली तुमची मऊसूत आणि झटपट दूध बर्फी! वरून आवडीनुसार काजू-बदाम किंवा वेलची घालून ती आणखी स्वादिष्ट करता येईल.