लाईफस्टाईल

Shravan Special Recipe : कणकेचा शिरा मऊ-लुसलुशीत कसा कराल? श्रावणासाठी नोट करून ठेवा ही सोपी रेसिपी

श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी यंदा रव्याचा शिरा न करता ट्राय करा कणकेचा स्वादिष्ट शिरा. साजूक तूप, ड्रायफ्रुट्स आणि केशराच्या स्वादाची ही सोपी रेसिपी घरच्या घरी नक्की करून पाहा.

Mayuri Gawade

श्रावण महिना सुरू झाला की घरात पूजा, व्रत-वैकल्यं आणि सणांची लगबग सुरू होते. या दिवसांत नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवण्याची तयारीही केली जाते. दरवेळी रव्याचा शिरा किंवा खीर करण्यापेक्षा यंदा थोडा वेगळा पदार्थ करून पाहायचा असेल, तर कणकेचा शिरा नक्की ट्राय करू शकता.

साजूक तुपात मंद आचेवर भाजलेली कणीक, त्यात साखर, दूध किंवा कोमट पाणी आणि वरून ड्रायफ्रुट्स-केशर असा साधा मेळ या शिऱ्याला छान चव देतो. श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी किंवा घरातील छोट्या पूजेसाठीही हा गोड पदार्थ करता येईल.

कणकेचा शिरा करण्यासाठी साहित्य

  • गव्हाची कणीक - १ कप

  • साखर - १ कप

  • साजूक तूप - १ कप

  • कोमट दूध किंवा पाणी - २ कप

  • काजू, बदाम, बेदाणे - अर्धा कप

  • केशर - ४ ते ५ काड्या

कणकेचा शिरा कसा करायचा?

सर्वप्रथम कढईत साजूक तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि बेदाणे हलके परतून घ्या. ड्रायफ्रुट्स छान परतले की ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा.

आता त्याच कढईत गव्हाची कणीक घाला. मंद आचेवर कणीक सतत हलवत भाजणे महत्त्वाचे आहे. कणकेचा रंग हलका सोनेरी झाला आणि तुपाचा छान सुगंध येऊ लागला की ती व्यवस्थित भाजली आहे असे समजा.

यानंतर त्यात साखर घालून नीट मिसळा. आता हळूहळू कोमट दूध किंवा पाणी घालत सतत ढवळत राहा. एकदम पाणी घातल्यास गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे हा टप्पा काळजीपूर्वक करा.

शिरा घट्ट होत आला की त्यात परतलेले ड्रायफ्रुट्स आणि केशर घाला. दोन-तीन मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊ द्या. शेवटी वरून थोडे साजूक तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

शिरा मऊ-लुसलुशीत होण्यासाठी या टिप्स

  • कणीक ताजी आणि बारीक वापरा.

  • कणीक मंद आचेवर व्यवस्थित भाजा.

  • दूध किंवा पाणी नेहमी कोमट वापरा.

  • पाणी किंवा दूध हळूहळू घालत सतत ढवळत राहा.

  • शेवटी थोडे साजूक तूप घातल्याने चव आणि पोत सुधारतो.

  • केशर वापरणार असाल तर ते आधी थोड्या कोमट दुधात भिजवून घाला.

  • शिरा तयार झाल्यावर दोन-तीन मिनिटे झाकून ठेवल्यास तो अधिक मऊ होण्यास मदत होते.

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली

आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

डाएटवाल्यांसाठी खास! नाश्त्यात बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की; १० मिनिटांत होईल तयार